बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत विरोधकांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला आहे. सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी पण त्यासाठी आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही त्यावरून निशाणा साधला आहे. आका आजही मंत्रिमंडळात असल्याची टीका त्यांनी केली.
बीडमधील पोलीस खाते करा बरखास्त
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर पूर्वीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या हत्येविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर मुख्य आरोपींसह इतर आरोपींना अटक झाले. याप्रकरणी संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे. बीड मधील संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. या ठिकाणी नव्याने नेमणुका व्हायला पाहिजे त्यानंतर तपास व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने तपास करणं अवघड आहे, असे ते म्हणाले.
अभिजात भाषेचा GR कधी?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ही घोषणा विधानसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांनी केली. आम्ही कसे तारक आहोत, संरक्षक ,प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले. पण अद्याप अभिजात भाषेचा GR आला नाही. इतर भाषेंचे परिपत्रक आले आहे. मग हा राजकीय जुमला होता का? असा निशाणा संजय राऊत यांनी मोदी सरकावर साधला.
लाडकी बहीण योजनेवरून टीका
लाडकी बहीण योजनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जे पैसे गेले आहेत ते पैसे परत काढू नका. बहिणींची मते घेतली आता त्यांचे काम झाल्यावर त्या बहिणीच्या हातातून पैसे काढत आहे, तेव्हा तुम्हाला कळले नाही का पैसे देताना, असा सवाल राऊतांनी केला. राज्य आर्थिक संकटात आहे. कर्मचार्यांना पैसे देण्यासाठी पैसे नाही. शिक्षकांना पैसे देण्यासाठी नाही. निवडणुकासाठी हातखंडे वापरले ते आता उघड होत आहे, असा निशाणा राऊतांनी सरकारवर साधला.