मुंबई : बेस्टच्या (BEST) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या काळापासून प्रलंबित असलेला वेतनप्रश्न मार्गी लागला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बेस्ट व्यवस्थापकांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर विधान परिषदेतील शिवसेना (Shivsena) गटनेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील आता सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देखील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे उपलब्ध करुन देण्यास सांगितल्याची माहिती परब यांनी दिली.
(महाव्यवस्थापक आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर शिवसेना प्रणित बेस्ट कर्मचारी सेनेचे नेते)
आमच्या संघटनेचे कर्मचारी आज (28 ऑगस्ट) केलेला हा करार मान्य करतील. ज्यांना हा करार पटेल ते करार मान्य करतील. ज्यांना पटणार नाही ते मान्य करणार नाही, असं म्हणत परब यांनी बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांना टोला लगावला. दरम्यान, मागील महिन्यात बीआरआय अॅक्ट (BRI Act) रद्द झाला आहे. त्यामुळे आज आम्हाला करार करण्याचा अधिकार मिळाला आहे, असंही परब यांनी नमूद केलं.
कृती समितीच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रणही नाही
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीला बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रित करण्यात आले नाही. याचे समर्थन करताना अनिल परब म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत मागच्या बैठकीत चांगला तोडगा दिला होता. मात्र, त्यावेळी आम्हाला कृती समितीच्या नेत्यांचा वाईट अनुभव आला. त्यांनी बैठकीच्या बाहेर येऊन उद्धव ठाकरेंनी काहीही तोडगा दिला नाही, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे यावेळी त्यांना बैठकीला बोलावले नाही.”
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत झालेल्या उद्धव ठाकरे आणि महाव्यवस्थापक यांच्या बैठकीला केवळ शिवसेना प्रणित बेस्ट कर्मचारी सेनेचे नेते हजर होते.
शिवसेनेची फसवी मध्यस्थी नको : शशांक राव
बेस्ट कर्मचारी सेनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली. यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीचे प्रमुख शशांक राव यांनी सुरुवातीला काहीही बोलण्यास नकार दिला. मी आधी चर्चा करणार आणि मगच बोलणार अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तासभर चर्चा झाली. यानंतर शशांक राव यांनी कृती समितीच्या सदस्यांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्हाला शिवसेनेची फसवी मध्यस्थी नको आहे. जर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या फॉर्मुल्याप्रमाणे मान्य न झाल्या नाही, तर हे उपोषण सुरुच राहणार आहे.” त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी अपयशी ठरल्याचे चित्र आहे.