मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. संपाच्या आठव्या दिवशीही तोडगा निघालेला नाही. आज हायकोर्टात संपाबाबत सुनावणी झाली. हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना झापलं. जर कामगार संघटना उद्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास, राज्य सरकार त्यांना जे काही कायदेशीर करणं शक्य आहे ते करू शकतात, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी दिले. इतकंच नाही तर बेस्ट कामगार संघटनांनी आपली भूमिका कोर्टाला कळवावी, असा आदेशही हायकोर्टाने दिला.
राज ठाकरे यांचं पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेस्ट संपाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत बेस्ट संपकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मनसेला प्रतिनिधीत्व मिळावं, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना प्रतिनिधीत्व मिळावं अशी विनंती राज यांनी आपल्या पत्रात केली आहे.
आज तरी या संपावर तोडगा निघतो का याकडे बेस्ट कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे डोळे लागले होते. आजही बेस्ट संपाबाबत हायकोर्टात सुनावणी झाली. त्याआधी मंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. केवळ 5 मिनिटे ही बैठक चालली. या बैठकीचा अहवाल आज हायकोर्टात सादर केला. दरम्यान बेस्टच्या खासगीकरणाला आमचा नेहमीच विरोध आहे, आजतरी संपावर तोडगा निघतो का हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी दिले.
उच्चस्तरीय समितीसोबत बैठक झाली. आम्ही आमच्या मागण्यांबाबत म्हणणं मांडले आहे. उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याबाबत आम्हाला काहीही सांगितले नाही. आम्ही आमची भूमिका उच्चस्तरीय समितीसमोर मांडली. काही त्रुटी होत्या त्यावर चर्चा झाली. आज उच्चस्तरीय समिती अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे. न्यायल्यावर आमचा विश्वास आहे, तोडगा निघेल. बेस्टला घाटयातून बाहेर काढण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. – शशांक राव
बेस्ट बसच्या इतिहासात कर्मचा-यांनी केलेला संप हा सर्वाधिक मोठा संप ठरला आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
बेस्टच्या संपाचा आजचा आठवा दिवस असून बेस्टच्या संपावर कालही काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज दुपारी हायकोर्टात बेस्ट संपावर पुन्हा सुनावणी होणार असून, कृती समिती आणि उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर संपावर निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, कालच्या सुनावणीत संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने चांगलंच झापलं. तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता, संप सुरु ठेवून चर्चा कशी करणार असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. त्रिस्तरीय समिती स्थापनेनंतर संप थांबवायला हवा होता असंही कोर्टानं सांगितलं.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बेस्टचा संप सुरु असताना काल राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र फक्त पाच मिनिटच दोघांमध्ये चर्चा झाली.
संपावर तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे काल रस्त्यावर उतरली. यावेळी मनसेने कोस्टल रोडचं काम वरळीत बंद पाडलं पाडलं.
कर्मचाऱ्यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही. त्यामुळं काल त्यांनी पुन्हा समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय. त्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असा सवालही कर्मचा-यांनी उपस्थित केला.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार बेस्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष अरविंद कागीनगर यांनी दिला आहे. प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गंभीर नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
संबंधित बातम्या
बेस्टच्या संपाचा सातवा दिवस, अद्याप कोणताही तोडगा नाही
BEST STRIKE: संप चालू ठेवून तोडगा कसा काढणार? हायकोर्टाने झापलं