मुंबई: संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी झालेल्या भेटीत, राज यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना एकत्र राहा, असा सल्ला दिला. “बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्रास देऊन बेस्टचं खासगीकरण करायचं आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी करण्याचा डाव आहे. बेस्टचे डेपो विकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तुम्ही सर्वजण एकजूट राहा”, असं राज ठाकरे म्हणाले.
आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होतंय, आम्हाला तोटा दाखवला जातो, शिवसेनेचं वर्चस्व असलेलं बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे, 45 दिवसांनी आमचा पगार होतोय, अशी कैफियत कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे मांडली
कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडली
दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांच्या पत्नीही आजच्या बैठकीला हजर होत्या. बेस्ट प्रशासनाने घरं सोडण्याच्या नोटीसीवर बळजबरीने सह्या घेतल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला.
“बेस्टचा संप सुरु असताना, कर्मचाऱ्यांच्या पत्नी घरी होत्या, त्यावेळी त्यांच्या हाती इंग्रजीतील नोटीस थोपवली, आमच्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि घरं खाली करण्याची नोटीस दिली”, असं महिलांनी राज ठाकरेंना सांगितलं.
आमच्या सर्व अपेक्षा तुमच्यावर आहेत. आम्हाला न्याय द्या, अशी विनंती यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी राज ठाकरेंकडे केली.
यादरम्यान कर्मचाऱ्यांनी आणलेला बुके राज ठाकरेंनी नाकारला, संप मिटल्यावर बुके द्या, असं राज ठाकरे म्हणाले.
घरं खाली करण्याच्या नोटीस
संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. मेस्मा अर्थात ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम कायद्यांतर्गत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. 8 जानेवारी अर्थात कालपासून 30 हजार बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या कामगार संघटनेने आपला संप काल स्थगित केला, मात्र दुसरी संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यानुसार भोईवाडा, वडाळा, नारायण बिल्डिंग,कुलाबा या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2000 घरांना नोटीस दिली गेली. तर 300 लोकांना मेस्माअंतर्गत कारवाईच्या नोटीस दिल्या आहेत.
सुमारे 300 ते 350 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्याची नोटीस मिळाली आहे. काहींना कोर्टाच्या अवमान करण्याची नोटीसही दिली जाणार आहे. (औद्योगिक न्यायालयाने हा संप करू नये असं सांगितलं होतं)
संपाचा तिसरा दिवस
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईतील जवळपास 30 हजार 500 कर्मचारी 8 जानेवारी पासून संपावर गेले आहेत. लोकल प्रमाणे बेस्ट देखील मुंबईची लाईफलाईन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संपांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या संपामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत.
दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये वीजपुरवठा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र संपावर तोडगा न निघाल्यास बेस्टचे वीजपुरवठा कर्मचारीही संपावर जाण्याच्या तयारीत आहे. जर हे कर्मचारी संपावर गेले तर मुंबई अंधारात असेल.
दरम्यान, बस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे टॅक्सी चालक संधीचा फायदा घेताना दिसून येत आहेत. संप असल्याने मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या काही बस सोडण्यात येत आहेत, तर जास्तीच्या लोकलही सोडण्यात येत आहे. तरीही अनेकांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा घेत टॅक्सी चालक त्यांच्याकडून मनमानी पैसे घेत आहेत. मीटरने न जाता वाट्टेल तेवढे पैसे हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून लुटत आहेत.
काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
* ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
* 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
* एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
* 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
* अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.