भांडुप विधानसभा मतदारसंघ : मुंबईचे मिनी कोकण असलेल्या भांडुपमध्ये कोण मारणार बाजी?

| Updated on: Oct 22, 2024 | 9:56 PM

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येत्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य लढतीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आहे.

भांडुप विधानसभा मतदारसंघ : मुंबईचे मिनी कोकण असलेल्या भांडुपमध्ये कोण मारणार बाजी?
Follow us on

Bhandup West Assembly Constituency 2024 : मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग म्हणून भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. मुंबईतील कोकणी माणसांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय, कष्टकरी समाजाचे वर्चस्व आहे. भांडुप पश्चिम या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. वाहतूक कोंडी, पिण्याची पाण्याची समस्या, मलनिस्सारणाची व्यवस्था हे मुद्दे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गाजताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेचं लक्ष लागले आहे.

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 282 मतदान केंद्र आहेत. भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुंबई महापालिकेचा प्रभाग क्रमांक 111 हा प्रभाग वगळून 109 ते 116 प्रभाग येतात. या मतदारसंघात ७० टक्के मराठी भाषिक लोकांचे वास्तव्य आहे. त्यासोबतच भांडुपमध्ये उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुस्लीम, गुजराती आणि शीख असे सर्वधर्मीय लोक या ठिकाणी राहतात. हा मतदारसंघ केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून भांडुप विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा मात्र अभाव पाहायला मिळतो.

इतिहास आणि राजकीय समीकरणे

भांडुप विधानसभा मतदारसंघांची स्थापना झाल्याच्या पहिल्याच वर्षी 1978 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने बाजी मारली. त्यानंतर 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संपूर्ण ताकद लावत या मतदारसंघात आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1990, 1995 आणि 1999 अशी सलग तीन वर्षे शिवसेनेच्या लिलाधर डाके यांनी विजय मिळवत हा मतदारसंघ काबीज केला. यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादीने या मतदारसंघातून संजय दीना पाटील हे आमदार म्हणून विजयी झाले.

यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या शिशिर शिंदेंनी मोठी बाजी मारली. यानंतर 2014 आणि 2019 या दोन्हीही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा ताकद लावत हा मतदारसंघ काबीज केला. सध्या रमेश कोरगावकर हे भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रमेश कोरगावकर हे कट्टर शिवसैनिक असल्याने शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणे पसंत केले.

भांडुप मतदारसंघातील समस्या

भांडुप मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भांडुपमधील अनेक रस्ते हे अरुंद आहेत. यामुळे बहुतांश वेळा या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे भांडुपमध्ये एकही शासकीय रुग्णालय नाही. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, मनोरंजनासाठी नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्राचीही सुविधाही इथे उपलब्ध नाही. भांडुपमध्ये नाले रुंदीकरणचा प्रकल्पही अद्याप कागदावर आहे.

मनसे विरुद्ध ठाकरे गट लढत होणार?

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे पुन्हा भांडुपमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे भांडुप विधानसभा मतदारसंघाची मनसेकडूनही चाचपणी सुरु आहे. मनसे नेते अमित ठाकरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जातं आहे. त्यामुळे या मतदारसंघात मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात एकूण 282 मतदारसंघ आहेत. हा खुला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २ लाख ९८ हजार ५१० मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ६८ हजार २३४ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १ लाख ३१ हजार २५५ इतकी आहे. येत्या निवडणुकीत भांडुप विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.