मुंबई : भीम आर्मीने मुंबईतील दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी केली आहे. दादर स्टेशनचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशन करा, अन्यथा चैत्यभूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. 6 डिसेंबरला भीम आर्मी स्वतःच दादर स्टेशनचं नामांतर करणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, प्रभादेवी या स्टेशनची नावं बदलण्यात आली. मग दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचं नाव का दिलं जात नाही, असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी हा इशारा दिलाय.
भीम आर्मीने दादर स्टेशनचं नाव बदलण्यासाठी यापूर्वीच तीन महिन्यांचा अल्टीमेटम दिला होता. मागणी मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर येऊ देणार नाही, असा पवित्रा भीम आर्मीने घेतला होता. दादर चैत्यभूमीवर उद्या राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते जमा होणार आहेत.
भीम आर्मी ही उत्तर प्रदेशातील मोठी संघटना आहे, ज्याची स्थापना चंद्रशेखर आझाद आणि विनय रतन सिंग यांनी केली होती. इतर राज्यांमध्येही या संघटनेचा विस्तार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही आहेत.