पनवेल : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना पनवेलमध्ये एक अनपेक्षित घटना घडली आहे. पनवेलमध्ये करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात काही जणांकडून अजय सिंग सेंगर यांना मारहाण करण्यात आलीय. संबंधित घटना ही पनवेलच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ घडलीय. संबंधित परिसरात अजय सिंग सेंगर हे जात असताना त्यांना रस्त्यात अडवत मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना मारहाण करण्यांनी आपण मारहाण केल्याची जबाबदारी स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांच्यावर भीमशक्ती संघटने कडून हल्ला करण्यात आला आहे. सुभाष गायकवाड आणि सागर पगारे या दोघांनी सेंगर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल ही मारहाण करण्यात आल्याचं भीमशक्ती संघटनेचे सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी सांगितलं आहे. तसेच अजय सेंगर यांनी पुन्हा तसं काही वक्तव्य केलं तर पुन्हा चोप दिला जाईल, असा इशारा सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी दिला आहे.
“अजय सिंग सेंगर यांनी दोनवेळा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. ते लोकांना भडकवून सांगतात की, आपल्याला संविधानाची गरज नाही. संविधान बदला. आम्ही सर्वांनी या विरोधात पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. पण त्याने दोन वेळा जामीन घेतल्यामुळे तो बाहेर आला”, अशी प्रतिक्रिया सुभाष गायकवाड यांनी दिली.
“अजय सिंग सेंगर याने पुन्हा अशी कृती करु नये म्हणून आम्ही भीम सैनिकांनी त्याला चोप दिला आहे. मी खूप आनंदी आहे. अजय सिंगने पुन्हा महापुराषांविषयी गरळ ओकली तर आम्ही या स्टाईलनेच चोप देणार”, असा इशारा सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांच्याकडून देण्यात आला आहे.
संबंधित घटनेनंतर करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर हे पनवेल पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ते घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांना देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. “वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर श्रद्धांजली वाहली होती. त्यानिमित्त निषेध नोंदवण्यासाठी मी आवाज उचलला होता. त्यामुळे वंचितच्या आणि भीमशक्तीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे हा. प्रकार अतिशय निंदनीय आहे”, अशी प्रतिक्रिया अजय सिंग सेंगर यांनी दिलीय.