मुंबई : मुंबईत एका भोजपुरी गायकाची (Bhojpuri Singer) गर्दुल्ल्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल (3 ऑगस्ट) रात्री साडे दहाच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपुलाच्या सबवेमध्ये घडली. तेजकुमार राम असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
तेजकुमार गेली चार वर्ष विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये असलेल्या रेड चिली हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. काल रात्री सायकलवरुन पार्सल देऊन हॉटेलकडे परतत असताना पूर्व द्रुतगती मार्ग येथील उड्डाणपुलाखाली दोन ते तीन जणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही हत्या जबरी चोरीच्या हेतून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
तेजकुमार हा डिलिव्हरी बॉय विक्रोळीतील रेड चिली हॉटेलमध्येच राहत होता. एक वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. तो मूळचा बिहारचा असून त्याने आतापर्यंत अनेक गाणीही भोजपुरीमधून गायली आहेत. तेजकुमारचे अनेक गाण्याचे अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत.
यापूर्वीही तेजकुमारवर अशा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असं त्याच्या मित्र मंडळीने सांगितले. विक्रोळीत झालेल्या या हत्येमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.