मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील काळाचौकी परिसरातल्या मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. तब्बल 6 ते 7 ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला होता. स्फोटाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आग लागली होती. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. याट सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आतमध्ये असलेल्या गाद्यांना पेट घेतला आणि आग वाढत गेली होती.
बीएमसीची हा शाळा तीन चार वर्षांपासून बंद होती. या शाळेतील विद्यार्थी इतर विभागात पाठवले गेले. त्यानंतर ही शाळा तोडण्याचं काम सुरू केलं होतं. परंतु काही दिवसानंतर तोडण्याचं काम बंद करण्यात आलं. कोविड काळाता लसीकरण केंद्र म्हणून या शाळेचा वापर करण्यात आल्याचं ठाकरे गटाचे पदाधिकारी अनिल कोळी यांनी सांगितलं.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. आगीच्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र बंद शाळेतील सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.