सुमेध साळवे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : डॉ. जयश्री पाटील (Jayshree Patil) यांच्यासह कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कष्टकऱ्यांचा कळवळा मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं. 118 एसटी कर्मचारी यांचे महाविकास आघाडी सरकारने निलंबन केले होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर निदर्शने करण्यात आली होती. त्या सर्व क्रांतीवीरांना सेवेत घेण्यात आल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी दिली.
शरद पवार म्हणायचे एस कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार होईल. पण, विरोधी पक्षनेते अजित पवार बघा, 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार झाला नाही. आणि हे 118 सुद्धा डंके की, चोट पे मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्यात निर्णय झाला. हे 118 एसटी कर्मचारीही सेवेत दाखल झालेत. कारण यांचे निलंबन रद्द करण्यात आलंय, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
कष्टकरी जनसंघ हा बलशाली संघ आहे. मुंबईत 24 हजार कष्टकरी आहेत. ते मनपा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतील, असं सदावर्ते यांनी म्हटलं.
आझाद मैदानात 50 हजार कष्टकऱ्यांचा मेळावा होईल. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला होकार दिल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं.
चेंबरमध्ये बोलावून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहासाठी विचारलं. ते म्हणाले, तुम्ही खूप लढलात. याला म्हणतात, सामान्य माणसानं सामान्य माणसाचं केलेलं कौतुक, असंही सदावर्ते म्हणाले.
एसटीतील निलंबित झालेल्या 118 क्रांतीवीरांना सेवेत पुन्हा घेतले. दिवाळी अगोदर पगार मिळेल, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली.