सातारा : बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेची आणि महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी माफ करा, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. (Abhijit Bichukale Agitation in Azad Maidan)
अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील घरपट्टी माफ करा, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवदेन पाठवले होते. या निवेदनात ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करेन, असे म्हटले होते. बिचुकले यांनी पाठवलेल्या या निवदेनाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येत्या 23 जानेवारीपासून अभिजीत बिचुकले बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे.
अभिजीत बिचुकले नेमकं काय म्हणाले?
“मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे कर माफ करा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी १० डिसेंबरला पत्र लिहिले होते. राज्यातील सर्व नगरपालिकांना याबाबतचे आदेश देऊन घरपट्टी माफीचे आदेश काढा. यासाठी मी एक महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं. जर मागण्या मान्य केलं नाही, तर मी मातोश्रीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करेन. पण मातोश्रीसमोरील या आंदोलनाला नकार मिळाला. मी 23 जानेवारीला आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे,” अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली.
“मी शिवरायाच्या विचारांचा वारसा जपतो. जर आज महाराज असते तर त्यांनी शेतचारा, जमिनीचे हप्ते माफ केले असते. मी सध्या घरपट्टीचा मुद्दा उचलतो आहे. ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी, माझा लढा माझ्या राज्यातील जनतेसाठी,” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले.
“शिवसेना पक्ष सांगलीत या मुद्द्यावरुन लढत आहे. जर शिवसेना सांगलीत लढत असेल, तर मुंबईसाठी दुटप्पी भूमिका का मुंबईकरांची घरपट्टी का माफ करत नाही?” असा प्रश्न अभिजीत बिचुकलेंनी उपस्थित केला आहे. (Abhijit Bichukale Agitation in Azad Maidan)
संबंधित बातम्या :
अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ