मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवनसमोर ही घटना घडली आहे. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनला येत होते. ते शिवसेना भवनसमोर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला टन घेत होता. यावेळी मागून येणाऱ्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. या धडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाईकस्वार हा गाडीला धडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्या बाईकस्वाराला पकडलं. त्याला रस्त्याच्या बाजूला नेलं. तसेच आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा केला. तसेच इतर वाहतूक सुरळीत केली. या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बाईकस्वाराची विचारपूस देखील केली. आदित्य ठाकरे पुढे निघून गेल्यानंतर पोलिसांकडून या बाईकस्वाराची चौकशी सुरु आहे.
आदित्य ठाकरे यांचा ताफा हा शिवसेना भवनच्या दिशेला उजव्या बाजूने वळण घेत होता. यासाठी त्यांच्या ताफ्याची गती कमी देखील झाली होती. पण दुचाकीस्वार पाठून भरधाव वेगाने आला. त्याने पुढे न बघता दुचाकी पुढे नेली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची गाडी पुढे होती. यावेळी बाईकस्वाराने ब्रेक दाबला. पण तो गाडीवर नियंत्रण मिळवण्यात कमी पडला. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या गाडीला त्याची गाडी धडकली. यावेळी बाईकस्वार स्वत: दुचाकीवर पडताना वाचला. त्यानंतर लगेच आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक आणि पोलीस तिथे दाखल झाले. सुदैवाने कोणतंही नुकसान झालं नाही.
आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना नॉर्मल होती, असं त्यांनी सांगितलं आहे. पण संबंधित घटनेमुळे तिथे जमलेल्यांचा नागरिकांचा काही क्षणासाठी श्वास रोखला गेला होता. कारण आदित्य ठाकरे हे तरुण आणि धडाकेबाज नेते आहेत. त्यांच्या वडिलांचं, आजोबाचं आणि पंजोबाचं मुंबई आणि राज्यासाठी मोठं योगदान आहे. तसेच ते स्वत: मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासोबत अशी काही घटना घडली की नागरिकांना धडकी भरणं साहजिकच आहे.
आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य वेगाने वाहनं चालवायला हवीत. कारण आपण सुरक्षित तर सर्व सुरक्षित. तसेच आपल्यामुळे इतरांनादेखील त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. संबंधित घटनेतून सर्वसामान्यांनी हाच बोध घ्यायला हवा.