मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपचा संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थतज्ज्ञ विवेक देव राय यांनी संविधान बदलण्याबाबतचा लेख लिहिला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईल यांनीही भारताच्या राज्यघटनेचा ढाचा बदलण्याची भूमिका मांडली आहे. यावरून भाजपला संविधान बदलायचंय हे स्पषट होतं. त्याचा आम्ही निषेध करतो. देव राय यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, असं आव्हानच नाना पटोले यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच विवेक देबराय आणि रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील जागा नक्कीच वाढतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या 40 ते 45 जागा जिंकेल असा अंदाज आहे. लोकांचा कौलही तसाच दिसून येतोय, असा दावा नाना पटोले यांनी केला.
कुठला सर्व्हे काय सांगतो माहीत नाही. पण इंडियाला लोक पसंतील देतील असं चित्रं आहे कारण बेरोजगारी आणि महागाई वाढलेली दिसत आहे. लोक त्याला कंटाळले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे लोक मतपेटीतून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मी पुन्हा येईल म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांची काय अवस्था झाली हे पाहायला मिळालं. मोदींच्या बोलण्यातून घमंडीपणा मोदी दिसून येतोय. त्यामुळेच ते मी पुन्हा येईल असं म्हणत आहेत. ते परत आल्यावर पाहून घेऊ, असंही ते म्हणाले.
घोषणा घोषणा घोषणा म्हणजे काय तर पंतप्रधानांचं फेकणं सुरू आहे. लोकशाही लोकांच्या जीवावर चालते. त्यामुळं नेत्यांना लोकं उत्तर देतीलच, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करून आमदारांनी मंत्रीपद घेतल्याचं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भरत गोगावले यांच्यासारखेच अनेक आमदार नाराज आहेत. कारण अनेकांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. त्यामुळं नाराजी अजून वाढेल, असा दावा त्यांनी केला.