मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि नारायण राणेंमधला वाद आता कोर्टात गेलाय. कारण नारायण राणे यांच्या एका वक्तव्यानंतर संजय राऊतांनी राणेंना नोटीस दिलीय. यापुढची लढाई कोर्टातही लढली जाईल असे संकेत संजय राऊतांनी दिले आहेत. नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातली शाब्दिक लढाई आता कोर्टापर्यंत पोहोचलीय. भांडुपमधल्या कोकण महोत्सवात नारायण राणेंनी संजय राऊतांवर एक आरोप केला होता. त्या आरोपांविरोधात संजय राऊत कोर्टात गेले आहेत. संजय राऊतांना पहिल्यांदा आपणच खासदार केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. त्यालाही संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊतांनी राणेंना कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालंय. किरीट सोमय्या-काही गोष्टींवर न बोलणं उचित असत, उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी 27 वेळा जेलमध्ये टाकायची भाषा केली होती. काही लोकं उद्विग्न असतात.
प्रतापराव जाधव- संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकला तर राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल आणि आमचाही वेळ जाईल म्हणून आम्ही नादी लागत नाही.
आशिष शेलार- संजय राऊत यांना नोटीस पाठवण्याचा अधिकार पण तुमचं बोलणं, भाषा यावर जर केसेस झाल्या तर राऊत यांना एखाद्या न्यायालयातच घर बांधावं लागेल.
वैभव नाईक- नारायण राणे म्हणतात मी संजय राऊत यांना निवडून आणलं पण हेच नारायण राणे शिवसेनेविरोधात दोन वेळा पराभूत झालेत. त्यामुळे स्वतः पराभूत झालेले दुसऱ्यांना काय निवडून आणणार. एकही रुपया न घेता त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा संजय राऊत यांनी दाखल केलाय ते योग्य आहे.
म्हाडा वसाहतीतल्या अनिल परब यांच्या कथित कार्यालयावरुन किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातही जोरदार वाद झाला. त्यावेळीही परबांनी सोमय्यांना नोटीस पाठवण्याचा इशारा दिला. त्यामुळं आता ठाकरे गट विरुद्ध भाजपची लढाई कोर्टातच होण्याची शक्यता आहे.