नवी दिल्लीः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर राज्याच्या राजकारण प्रचंड गदारोळ माजला. सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावरून अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न करत त्यांच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली. त्यानंतरही अजित पवार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, इतिहासामध्ये फितूर माणसाचं पर्यायी नाव जर काय असेल तर ते अनाजी पंत होते,
मात्र आज हिंदुत्वाशी, महाराष्ट्र प्रेमाशी, मराठी माणसांशी आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मराठीशाहीच्या इतिहासाची फितुरी करणारा व्यक्ती ही सामनाच्या प्रभादेवीच्या कार्यालयात कार्यकारी संपादक म्हणून बसली असल्याची टीका संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मवीर नव्हते आणि त्या पुढे जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की औरंगजेब तर क्रूर नव्हता तो हिंदुद्वेष्टाही नव्हता ही एक नवीन स्क्रीप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लिहिली जाते आहे असा जोरदार टोलाही त्यांना लगावला आहे.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे शिकवला तो ‘जिहाद’ आणि औरंगजेबने मराठी माणसांबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आणि आमच्या बरोबर केला तो हिंदू द्वेष नाही अशाच मांडणीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना चालली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची टकमक टोकापर्यंत पोहोचवण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी करते आहे. त्यामुळे या शिवसेनेचे आधुनिक अनाजी पंत त्याचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही अशी जहरी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांना राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल भाजप शांत का आहे असा सवाल केला असता त्यांनी राज्यपालांनी स्पष्टीकरण दिले असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिले आहे का असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे.
ज्या अजित पवार यांची पाठराखण ठाकरे गट करत आहे त्यावरून असं दिसतं आहे की, ठाकरे गटाला वैचारिक लकवा झाल्याची जहरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.