मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका पत्रकार तरुणीला आधी टिकली लाव, मग प्रतिक्रिया देईन, असं म्हटल्याने त्यांच्याविरोधात सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठली होती. राष्ट्रवादी काँग्रेसपासून, काँग्रेससह विविध पक्षाच्या नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. भिडे यांच्या वक्तव्यावरुन वाद शमला असताना आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधलाय.
सुप्रिया सुळे आज पुण्यातील पिंपरी येथील पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार तरुणी आणि महिलांच्या पोषाखाबद्दल विधान केलं. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी या पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. पण त्यापेक्षा त्या साडी नेसून मराठी संस्कृतीचं जतन का करत नाहीत? अशा प्रकारचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय.
सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दलच्या विधानाचा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असंदेखील त्या म्हणाल्या आहेत.
‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..?
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाले “साड़ी” पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड़ देंगे क्या..?
चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये pic.twitter.com/O55GM9xqWt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 20, 2022
सुप्रिया सुळे व्हिडीओत नेमकं काय म्हणाल्या?
“मला खूप वेळा गंमत वाटते की, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना तुम्ही? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टनाईजेशन करतोय”, असं सुप्रिया सुळे संबंधित व्हिडीओ बोलताना दिसत आहेत.