राज्यात सध्या साऱ्यांचं लक्ष हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मित्रपक्षांमध्ये ज्या जागांचा तिढा सुटला आहे तिथून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. काही उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अद्याप काही जागांसाठी चर्चा सुरु आहे. अशात आता 2022 साली विधानसभा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे मुरजी पटेल उर्फ काका हे शिंदेच्यां शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुरजी पटेल यांचा याच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळू शकते. महाविकास आघाडीकडून अंधेरी पूर्व ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वीच विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीत मशाल या चिन्हावर विजयी झाल्या होत्या. ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती.
ऋतुजा लटके यांनी पु्न्हा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ऋतुजा लटके यांनी एबी फॉर्म स्वीकारल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळेस त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. “पहिली मशाल मीच पेटवली होती. दुसरी ही मशाल मीच पेटवणार. अनेक अडथळे समोर जाऊन पहिली मशाल पेटवली होती. आताची निवडणूक ही सोपी नाही, मेहनत करावी लागणार. कार्यकर्ते मेहनत देखील करतील”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
दरम्यान मुरजी पटेल यांनी 2022 मध्ये पोटनिवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला होता. तसेच जोरदार तयारीही केली होती. मात्र राज्यात एखाद्या घरातील लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय संस्कृती आहे. हीच संस्कृती कायम ठेवावी आणि निवडणूक बिनविरोध करावी, अशी आवाहन तेव्हा राज्यातील अनेक पक्षांकडून करण्यात आलं होतं. शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहान करत भाजपला राजकीय संसकृतीची जाणीव करुन दिली होती. त्यानंतर भाजपने पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय केला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र आता काही वर्षानंतर लटके विरुद्ध पटेल अशी लढत पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.