मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची पुन्हा शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. परब हे शिवसेनाप्रमुखांची शपथ का घेतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाही?, असा खोचक सवाल करतानाच अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राणेंच्या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bjp leader nitesh rane slams anil parab over ed enquiry)
नितेश राणे यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे. कडवट शिवसैनिकाला आता भाजपच पर्याय आहे. अनिल परब हे सकाळी उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय शर्ट पण घालत नाहीत. अशा व्यक्तीला तुम्ही चौकशीला बोलावल्यावर उद्धवजींच्या छातीत धडकी भरल्यासारखं झालं आहे. अनिल परब तो झांकी है उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं सूचक विधान राणे यांनी केलं.
गृहमंत्री अनिल देशमुख गायब झाले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख गायब आहेत तर परब यांना माहिती असेल. परब यांच्या नंतर मुख्यमंत्र्यांनाही चौकशीसाठी कधी बोलवतात यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं विधानही त्यांनी केलं.
अनिल परब यांच्यासारखा वकील माणूस सारखा शपथ घेत आहे. ईडी आली की यांना बाळासाहेब आठवतात. मुली आठवतात. बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेण्याऐवजी ते उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाहीत?, असा सवाल राणे यांनी केला.
अडचणीत आले की बाळासाहेब आणि वसुलीसाठी उद्धव ठाकरे अशी परब यांची अवस्था आहे. दर्शन घेऊन जायला केंद्रीय यंत्रणा ही काय मंगल कार्यालय नाहीये की या आणि लग्न करुन जा. काही केल नाही तर शपथा कशाला घेता? दर्शन कसली घेत आहात?, असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे. अंतर्गत धुसफुस ही एकाच्या नाही तर प्रत्येकाच्या मनात आहे. हिंदुत्वाच्या विचाराला मुठमाती द्यायला लागली ती केवळ एका माणसाच्या स्वार्थासाठी. शिवसैनिक हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. हा तर फक्त ट्रेलर आहे. भाजप हाच हिंदुत्ववादी पक्ष आहे. मात्र, शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे. हे शिवसैनिकांना कदापी सहन होणार नाही, असंही ते म्हणाले. (bjp leader nitesh rane slams anil parab over ed enquiry)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 September 2021 https://t.co/og9l4pXrVs #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
संबंधित बातम्या:
तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
(bjp leader nitesh rane slams anil parab over ed enquiry)