मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-भाजप (Shinde BJP) युतीने चांगलाच जोर लावलेला दिसतोय. यातच आता भाजप युतीतील आणखी एका पक्षाने नवा दावा केलाय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘भाजप RPI शिवसेना’ महायुतीचा विजय निश्चित आहे.मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि RPIचा उपमहापौर होईल. 5 वर्षात पहिला अडीच वर्ष उपमहापौर RPIचा आणि दुसऱ्या टर्मममध्ये उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना RPIच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे.. भाजप शिवसेनेने RPIच्या उमेदवारांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात रामदास आठवले यांनी हा दावा केलाय. विशेष म्हणजे या मेळाव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असे आश्वासन दिले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत असे सांगत आशिष शेलार यांनी ना.रामदास आठवले यांच्यावर कविता करीत सभेत रंगत आणली.
अहंकारामुळे त्यांचे सरकार, पक्ष, चिन्ह गेले
पण जनसेवक म्हणून भाजप बरोबर राहिले रामदास आठवले…
मतासाठी मोदींचे त्यांनी फोटो दाखवले
स्वार्थी सत्तेसाठी विश्वासघातकी झाले
पण आदर्श मैत्रीचे जीवंत उदाहरण रामदास आठवले…
अशा शब्दात आशिष शेलार यांनी रामदास आठवलेंच्या निष्ठेची स्तुती केली.
2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 फूटांचे घर देण्यात यावे तसेच खाजगी इमारतींना काल मर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरा सारखे प्राधिकरण असावे ; मुंबईत बंजारा भवन; कक्कया भवन बांधावे आशा विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.
यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, मुंबई उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा, अध्यक्ष स्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, स्वागताध्यक्ष साधू कटके, माजी मंत्री अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, आदी उपस्थित होते.