मुंबई: भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.
मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे 136 कोटी रु. वाचविले होते. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. 100 कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले, असं कोटेचा यांनी सांगितलं.
निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. विनोद मिश्रा यांनीही असेच पात्र महापालिका आयुक्तांना 21 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. 29 नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या. त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी 106 कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगतिलं.
या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे निवृत्त उपायुक्त हे ‘भ्रष्टाचाराचे महामार्ग’ तयार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: