BJP : महायुतीत फाटलं? रामदास कदम यांच्याविरोधात भाजप आक्रमक; ‘त्या’ इशाऱ्यामुळे खळबळ

| Updated on: Aug 20, 2024 | 3:18 PM

BJP on Ramdas Kadam : फाटेपर्यंत ताणू नये, या म्हणीचा महायुतीला जणू विसर पडत चालला आहे. अजितदादांच्या यात्रेला काळे झांडे आणि आता थेट थोबाड झोडण्याची भाषा, यामुळे महायुतीत अनेक ठिकाणी फाटल्याची चर्चा सध्या रंगली आहे. रामदास भाईंविरोधात भाजपने आक्रमक होत ही भूमिका जाहीर केली आहे.

BJP : महायुतीत फाटलं? रामदास कदम यांच्याविरोधात भाजप आक्रमक; त्या इशाऱ्यामुळे खळबळ
कोकणचो शिमगो, महायुतीत फाटलं?
Follow us on

तर महाराजा, कोकणच शिमगो काय संपत नायच हयं, पार गणेशोत्सव इलो तसा शिमगो पण इलो. तुम्ही म्हणाल आता तर गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मग तुम्ही शिमग्याची आठवण कशाला काढता. तर मुंबई-गोवा महामार्गावरुन महायुतीत शिमगा सुरु आहे, त्यामुळे आठवण झाली. सध्या महायुतीतील शिमगा जगजाहीर झाला आहे. अगोदर अजितदादा यांच्या यात्रेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंड दाखवले. तर आता शिंदे गटाचे रामदास भाई आणि भाजप रविंद्र चव्हाण यांचे तोंडी युद्ध आता हातघाईवर आले आहे. भाईंची टीका जिव्हारी लागल्याने भाजपने कोकणात एक मोठा निर्णय घेतला आहे.

वादाचं कारण तरी काय?

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला तेव्हा रामदास कदम यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली होती. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा या रस्त्याचा वनवास काही संपला नाही. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, मात्र या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही, असं कदम म्हणाले. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ रामदास कदम यांनी युतीला दिला होता. त्यानंतर ही शा‍ब्दिक चकमक आता थोबाड झोडण्यापर्यंत गेली आहे. तोंड सांभाळून बोललं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

माफी मागा अन्यथा…

कदम आणि चव्हाण यांच्या जुगलबंदी रंगली असतानाच रामदास कदम यांच्या वक्तव्यनंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. रामदास कदम यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा दापोली मतदार संघात महायुतीचा उमेदवार योगेश कदम स्वीकारणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. जिल्हाप्रमुख केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ही भूमिका जाहीर केली.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या विधानाचे पडसाद कोकणात पडले आहेत. माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गावर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. रामदास कदम यांच्या विरोधात रत्नागिरीत भाजपने जोरदार निदर्शने केली. रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे भाजप कार्यकर्ते आक्रमक दिसले.सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आला. .भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदमांचा पुतळा जाळला. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी जोडे मारत निषेध नोंदविला.

भास्कर जाधवांनी काढला चिमटा

रामदास कदम, रवींद्र चव्हाण दोघेही आमच्या कोकणातले आहेत. मी दोघांच्याही मुलाखती ऐकल्या. मला असं वाटतं या दोघांनी ही लवकरच रस्त्यावर उतरावे, मैदानात यावं, आ देखे जरा किसमे कितना है दम. दोघांनी एकमेकांना दम दाखवावा, त्यामध्ये कोण जिंकेल त्यांना जर पंच मिळाला नाही तर पंच म्हणून मी कुस्ती बघायला येईल, मी पंच व्हायला तयार आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काढला.

सरकारमध्ये एकवाक्यता नाही

मंत्री रवींद्र चव्हाण व रामदास कदम यांच्या वादावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. पण महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये काय वाद आहे यांचा आम्हाला रस नाही पण सरकार मध्ये एक वाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं. त्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकत नाही निवडणुकीत जे काय कोकणामध्ये पैसे वाटप झाले त्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे आता मात्र जनता सुज्ञ झाली आहे ते यापुढे त्यांची जागा दाखवतील, अशी टीका नाईक यांनी केली.