मुंबईत कुणाला मिळणार संधी, कुणाचा पत्ता कट? विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार

| Updated on: Aug 01, 2024 | 10:17 AM

मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी विविध बैठका घेतल्या जाणार आहे. या बैठकीनंतर याबद्दलची रणनीती ठरवण्यात येणार आहे.

मुंबईत कुणाला मिळणार संधी, कुणाचा पत्ता कट? विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार
Follow us on

BJP Assembly Election 2024 Plan : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध शहरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. त्यातच आता भाजपने मुंबईतील विधानसभा मतदारांसाठी विशेष प्लॅनिंग केले आहे.

अश्विनी वैष्णव यांच्याकडे मुंबईची जबाबदारी

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी विविध बैठका घेतल्या जाणार आहे. या बैठकीनंतर याबद्दलची रणनीती ठरवण्यात येणार आहे.

मुंबईत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट? 

यानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदारसंघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी भाजपकडून केली जाईल. ही वर्गवारी केल्यानंतर विधानसभेसाठी रणनीती ठरवण्यात येणार आहे. संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. हा रिपोर्ट तयार केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची, कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचे हे ठरवले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे मुंबईतील काही मतदारसंघात जास्तीत जास्त हिंदू मतदारापर्यंत पोहोचून जनजागृती केली जाणार आहे.

भाजपची राज्यातील २८८ जागांवर लढण्याची तयारी

दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असलो तरी भाजपने राज्यातील २८८ जागांवर लढण्याची तयारी केली आहे, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. आम्ही २८८ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी निरीक्षकही नेमले आहेत. परंतू आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जागा भाजपच्या वाट्याला येणार नाहीत त्याठिकाणी भाजपची तयारी सहयोगी पक्षांच्या उमेदवारांसाठी वापरली जाईल. कारण सहयोगी पक्षाचे उमेदवार जिंकले तरच सत्ता येणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.