पक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार?

| Updated on: Dec 05, 2021 | 1:06 PM

राज्यात मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार?
ashish shelar
Follow us on

मुंबई: राज्यात मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही महापालिकेचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर आधीपासूनच राज्यभरात दौरे करून पक्षाला बळ देण्याचं काम सुरू केलं आहे. कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून स्वारी करत शेलार यांनी राज्यभरात पक्षबांधणीवर जोर दिला आहे. मुंबईतही शेलार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत शेलारांचा सलग दुसऱ्यांदा करिश्मा चालणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने पक्षनेत्यांना कामाला लावले आहे. आशिष शेलारही पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळेच शेलार यांनी राज्यभर दौरे केले. आतापर्यंत त्यांनी राज्यातील 80 टक्के भाग पिंजून कााढला आहे. नुकतेच ते माथेरानला होते. रायगड जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण वर्गाला संबोधित करण्यासाठी ते आले होते. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेलारांना बोलावलं होतं. माथेरानला त्यांनी अर्धा प्रवास गाडीने आणि अर्धा घोड्यावरून केला. घोड्यावरून प्रवास करताना त्यांची दमछाक उडाली. मात्र, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी हा त्रासही सहन करत निश्चित स्थळ गाठलं.

जो तो म्हणतो शेलारच पायजेल

शेलार यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. जिल्हा पातळीवर त्यांनी कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यांवर कामाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात केली आहे. तसेच विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका जनतेत कशी मांडावी? कोणत्या प्रश्नांना हात घालायचा? कोणत्या प्रश्नांवर आंदोलने उभी करायची? याचे मार्गदर्शन शेलार कार्यकर्त्यांना करत आहेत. शेलार यांचं राजकीय विश्लेषण अचूक असतं, पक्ष बांधणीत त्यांचा हातखंडा आहे, तसेच संघटन कौशल्यातही ते दोन पाऊल पुढे आहेत, त्यामुळे राज्यभरात भाजपचे नेते त्यांना कार्यक्रमासाठी वारंवार बोलवत आहेत. केवळ पक्षातच नव्हे तर बिगर भाजप संघटनांकडूनही शेलार यांची मागणी असते. मराठा आरक्षणापासून ते एसटीच्या आंदोलनापर्यंत… प्रत्येक ठिकाणी शेलारांना बोलावणं होत असतं.

ashish shelar

बैलगाडीतून मिरवणूक

विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शिरुर तालुक्यातील नागरगाव येथे शेलार गेले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले होते. शिरूरमधील विकास कामं असो की नाशिकमध्ये झालेल्या हत्येनंतर घटनास्थळी जाऊन पीडितांचं सांत्वन करणं असो प्रत्येक ठिकाणी शेलार हजर असतात. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईतील क्रुझ पार्टी प्रकरणावरून भाजप नेत्यांवर घणाघाती हल्ले सुरू केले होते. त्यावेळी शेलार यांनी या प्रकरणात उडी घेऊन मलिक यांना अंगावर घेतलं होतं. या शिवाय सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक टीकेवर शेलार तात्काळ प्रतिक्रिया देऊन भाजपवरील हल्ला परतवून लावत असतात. त्यामुळेही शेलार सतत चर्चेत असतात.

ashish shelar

शेलारांचे दौरे वाढले

शेलार यांनी आतापर्यंत मराठवाडा, विदर्भ, नाशिक, जळगाव आणि कोकणात अनेकदा दौरे केले आहेत. कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेपासून ते विकास कामांच्या उद्घाटनापर्यंतच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. कार्यकर्त्यांकडून शेलारांची मागणी होत असल्याने त्यांचे दौरे वाढले आहेत. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे आणि कोल्हापूर सोडून बाहेर पडताना दिसत नाहीत. याउलट पाटील यांनी जे जे करण अपेक्षित आहे ते शेलार करताना दिसत आहेत. त्यामुळे शेलार यांचं पक्षातील वजन वाढतानाही दिसत आहे.

मुंबई महापालिकेसाठी शेलारांशिवाय पर्याय नाही

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होऊ घातल्या आहेत. मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मर्यादा पक्षाला माहीत आहे. राज पुरोहित यांचं नेतृत्वही मर्यादित आहे. त्यामुळे महापालिका जिंकण्यासाठी शेलार यांच्याशिवाय भाजपसमोर पर्याय नाही. शेलार हे पेशाने वकील आहेत. ते महापालिकेत नगरसेवक आणि गटनेते होते. त्यामुळे त्यांना मुंबईची खडा न् खडा माहिती आहे. शेलार आता आमदार असले तरी महापालिकेतील कारभाराची त्यांना खडा न् खडा माहिती असते.

शिवाय शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक, आमदार आणि खासदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिका जिंकून देण्यासाठी शेलार हेच भाजपसमोर उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे शेलार यांनीही गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या कामात लक्ष घालून शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं आहे.

शहा-मोदींची हमखास भेट

राज्याबरोबर केंद्रातही वजनदार नेता म्हणजे आशिष शेलार यांची ओळख आहे. चंद्रकांत पाटील अनेकदा दिल्लीत जातात. पण प्रत्येक वेळी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होईलच याची खात्री नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शेलार हे एकमेव नेते आहेत की जे दिल्लीत गेल्यावर शहा-मोदींपैकी एका तरी नेत्याची भेट घेऊन येतातच. यावरून शेलार यांचं केंद्रातही मोठं वजन असल्याचं दिसून येतं.

शेलारांची शिष्टाई अन् राजहंस सिंह आमदार झाले

विधान परिषदेच्या निवडणुकीतही आशिष शेलार यांचा करिश्मा पाहायला मिळाला. शेलार यांनी राजहंस सिंह यांना भाजपमध्ये आणले होते. मात्र, विधान सभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजहंस सिंह यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता विधान परिषदेच्या जागांसाठी चित्रा वाघ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच अचानक राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामागे शेलार यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. राजहंस सिंह यांच्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला कसा फायदा होऊ शकतो, याचं गणित पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात शेलार यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्षपदाचा चेहरा

शेलार हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी भाजप मुंबईत वाढवली होती. तसेच भाजपच्या नगरसेवकांची संख्याही त्यांच्या कार्यकाळात वाढली होती. शेलार हे उक्तृष्ट संघटक आहेत. त्यामुळेच राज्यात जेव्हा जेव्हा चंद्रकांत पाटील यांना बदलले जाण्याची चर्चा होते. तेव्हा तेव्हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नावांची जी चर्चा होते, त्यात शेलार यांचं नाव असतं.

ashish shelar

साहित्यिक वर्तुळात वावर

साहित्य वर्तुळातही शेलार यांचा मुक्त संचार असतो. मध्यंतरी ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतानाच प्रसिद्ध साहित्यिक ना. धो. महानोर, मारुती चित्तमपल्ली आणि महेश एलकुंचवार यांची त्यांनी भेट घेतली होती. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिलं होतं.

ashish shelar

 

संबंधित बातम्या:

VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी

Omicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली