काळी-पिवळी पद्मिनी प्रिमियर टॅक्सी इतिहासात जमा, शेवटच्या टॅक्सीचा प्रवास आजपासून संपला

| Updated on: Oct 29, 2023 | 1:11 PM

मुंबई आणि परिसरात एकेकाळी आलीशान समजली जाणारी काळी-पिवळी पद्मिनी प्रिमियर टॅक्सी मुंबईकरांची आवडती टॅक्सी होती. आता ही टॅक्सी इतिहास जमा झाली आहे.

काळी-पिवळी पद्मिनी प्रिमियर टॅक्सी इतिहासात जमा, शेवटच्या टॅक्सीचा प्रवास आजपासून संपला
premier padmini taxi
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : गेल्या पाच ते सहा दशकांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली आयकॉनिक पद्मिनी प्रिमियर कंपनीची काळी-पिवळी टॅक्सी अखेर इतिहास जमा झाली आहे. शेवटच्या पद्मिनी प्रिमियर टॅक्सीची नोंदणी ताडदेव आरटीओत 29 ऑक्टोबर 2003 रोजी झाली होती. पद्मिनी प्रिमियर टॅक्सींना दिलेली 20 वर्षांपर्यंतची आयुष्य मर्यादा संपल्याने शेवटच्या पद्मिनी प्रिमियरचा प्रवास संपला आहे. सध्या काळी-पिवळी टॅक्सी म्हणून विविध कंपनीच्या टॅक्सी शहरांमध्ये सुरु आहेत. परंतू ऐतिहासिक पद्मिनी प्रिमियर टॅक्सीचा प्रवास आता संपला आहे.

मुंबई आणि परिसरात एकेकाळी आलीशान समजली जाणारी काळी-पिवळी पद्मिनी प्रिमियर टॅक्सी मुंबईकरांची आवडती टॅक्सी होती. मात्र आता बदलत्या काळा बरोबर तिच्या नंतर आलेल्या कंपन्यांच्या कारना आरटीओने टॅक्सी म्हणून नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच मोबाईल एपवरील खाजगी ओला-उबर टॅक्सीची सेवा देखील आली आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या शेवटच्या लाल रंगाच्या डिझेलवरील डबल डेकर बसला अलिकडेच निरोप देऊन त्या मोडीत काढल्यात आल्या. आता याच मार्गावरुन शेवटची पद्मिनी प्रिमियर टॅक्सी रस्त्यावरून कायमची हद्दपार झाली आहे.

‘यह मुंबई की शान है, और हमारी जान है’, असे शेवटच्या रजिस्ट्रेशन ( MH-01-JA-2556 ) झालेल्या पद्मिनी प्रिमियर टॅक्सीचे मालक प्रभादेवीतील रहिवासी अब्दुल करिम कार्सेकर यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. मुंबईतील बेस्टच्या शेवटच्या डीझेल डबल डेकर बसचे 15 वर्षांची आयुष्य मर्यादा संपल्यानंतर काही दिवसात जुन्या पद्मिनी प्रिमियर टॅक्सी देखील निवृत्त झाल्याने मुंबईकरांच्या स्मृतीतील एकेक पान निखळत चालले आहे. मुंबईच्या वाहतूकीत मोलाची भुमिका बजावलेली दोन वाहतूकीची साधने एकामागोमाग काळाच्या पडद्याआड गेल्याने बेस्टच्या डबड डेकर बस प्रमाणे पद्मिनी प्रिमियर बस देखील इतिहास प्रेमींसाठी संग्रहालयात जतन करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

शहराच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावलेल्या या मजबूत समजल्या जाणाऱ्या पद्मिनी प्रिमियर टॅक्सीशी मुंबईकरांच्या भावना गेली पाच दशके जुळलेल्या असल्याचे क्लासिक कार प्रेमी डॅनियल सिक्वेरा यांनी म्हटले आहे. आम्ही मुंबई शहराची ओळख बनलेल्या अनेक वस्तूंचे जतन केले आहे. आम्ही या चालू स्थितीतील पद्मिनी टॅक्सीचे मॉडेलही जतन करू असेही त्यांनी सांगितले. आम्ही जुन्या टॅक्सीचे मॅकेनिकल मीटरही जतन केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत आता 40 हजार  टॅक्सी

मुंबईत आता सुमारे 40 हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. त्यात निळ्या-चंदेरी रंगाच्या वातानुकुलित कुल कॅबही आहेत. 90 च्या दशकात 63 हजार टॅक्सी होत्या. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते जनरल सेक्रटरी एल.एल.क्वड्रोज यांनी सांगितले की पद्मिनी प्रमियरचा टॅक्सी म्हणून प्रवास 1964 मध्ये ‘फियाट – 1100 डिलाईट’ या पॉवरफूल 1200 सीसी कारने सुरु झाला होता. प्लेमाऊथ, लॅंडमास्टर, Dodge आणि फियाट 1100, या मोठ्या टॅक्सीच्या तुलनेत ती लहान होती. 1970 मध्ये या पद्मिनी टॅक्सीचे मॉडेल बदलून प्रिमियर पद्मिनी असे करण्यात आले. त्यानंतर प्रिमियर ऑटोमोबाईल लिमिटेड ( PAL ) तिचे उत्पादन 2001 मध्ये बंद होईपर्यंत तेच कायम राहीले.