मुंबई: मुंबई महापालिकेचा (bmc) 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा शैक्षणिक अर्थसंकल्प (education budget 2022) आज सादर झाला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित कुंभार (ajit kumbhar) यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. 3370.24 कोटींच्या या अर्थसंकल्पात डिजीटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे. महापालिकेने डिजीटल शिक्षणासाठी 27 कोटींची तरतूद केली आहे. तसेच विद्यार्थ्यांची अकलन क्षमता वाढवण्यासाठी शाळेत बोलक्या संरक्षक भिंती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना हरभरे, मसूरडाळ आणि तांदूळही देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी उपस्थिती भत्ता आणि सर्व विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास मिळावा म्हणूनही या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. आहे त्या योजना सुरू ठेवण्यावर आणि शालेय प्रकल्प मार्गी लावण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित कुंभार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज शिक्षण समितीत मांडण्यात आला. यावेळी जुन्याच योजना सुरू ठेवण्यावर आणि डिजीटल शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता 1 ली ते 8 वीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. गुगल मीट, झूम, युट्यूब द्वारे शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी 19 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षात महापालिकेने 1214 वर्ग खोल्या डिजीटल केल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात 1300 वर्ग खोल्यात एलईडी इंटरॅक्टिव्ह पॅनलद्वारे डिजीटल वर्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या एकूण 2514 वर्ग खोल्यांचे डिजीटल क्लासरुम होणार आहे. तर इतर 5420 खोल्यांचे टप्प्याटप्प्याने डिजीटल वर्गात रुपांतर करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षात 1300 वर्ग खोल्या डिजीटल होणार असून त्यासाठी 27 कोटीची तरतूद करण्यात आल्याचं अजित कुंभार यांनी सांगितलं.
तसेच इयत्ता दहावीच्या 19401 विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी मोफत वस्तू देण्यात येणार आहेत. त्यात वह्या गणवेश, बुट-मोजे स्टेशनरी, सँडल, स्कूल किट, कॅनव्हास शूज व स्पोर्ट्स युनिफॉर्म आदींचा समावेश आहे. त्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला मिळून 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील मुलींच्या उपस्थिती प्रोत्साहन भत्त्यासाठी 7 कोटी 2 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
पालिकेच्या शाळेतील पहिल्या 25 विद्यार्थ्यांना पदवी किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी 25 हजार रुपये शैक्षणिक शुल्क म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी 28 लाखांची तरतूद करण्यात येणार आहे. पहिली ते 10 वीच्या मोफत बेस्ट प्रवासासाठी एकूण सव्वाचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांना 6 किलो हरभरा आणि 6 किलो मसूर डाळ तसेच 100 ग्रॅम तांदूळ देण्यात येणार आहे. या योजनेचा एकूण 2,88165 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तर, इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना 9 किलो मसूर डाळ, 9 किलो हरभरा,150 ग्रॅम तांदूळ देण्यात येणार आहे. त्याचा 2, 74663 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
महापालिकेच्या शाळेत बोलक्या संरक्षक भिंती उभारण्यात येणार आहेत. या भिंतीवर सामाजिक आणि नीतीमूल्यांचे संदेश देणारी चित्रे चित्रित केली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे. या बोलक्या संरक्षक भिंतींसाठी 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: दाट धुक्यांमुळे लोकल पाऊण तास लेट, प्रवाशांचा खोळंबा; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी