मुंबईः महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूक-2022’ (Election 2022) करिता 236 प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत (Confirmation of reservation’ and release) आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. आजच्या आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सार्वत्रिक निवडणूक -2022’ च्या अनुषंगाने आरक्षण सोडत ही यापूर्वी 31 मे रोजी काढण्यात आली होती.
तथापि, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी आजची सोडत काढण्यात येत आहे. तसेच यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गांसाठी 31 मे रोजीच्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर आजच्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चयाने करण्यासह सोडत काढण्यात येत आहे.
एकूण जागांपैकी 15 जागा ‘अ.जा.’ साठी, 2जागा ‘अ.ज.’ करिता; 63 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता तसेच एकूण 236 जागांपैकी 118 जागा महिलांसाठी राखीव; पैकी 8 जागा अनुसूचित जाती (महिला), 1 जागा अनुसूचित जमाती (महिला), 32 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी; तर77 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
या सोडतीसाठी गेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षणाच्या आधारे यंदाच्या निवडणुकीसाठी प्राधान्यक्रम निर्धारित करण्यात आला होता. या अंतर्गत गेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान ज्या प्रभागांमध्ये संबंधित आरक्षण नव्हते, त्यांना ‘प्रथम प्राधान्यक्रम’ निश्चित करण्यात आला होता. या प्रथम प्राधान्यक्रमानुसार ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ यासाठी 53 प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर दुसऱ्या प्राधान्यक्रमानुसार ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ यासाठी 2007 मध्ये आरक्षित असणारा; पण गेल्या 2 निवडणुकांमध्ये म्हणजेच वर्ष 2012 व वर्ष 2017 मध्ये सदर प्रवर्गासाठी आरक्षित नसणाऱ्या ५१ प्रभागांपैकी १० प्रभाग हे सोडत काढून निवडण्यात आले.
वरीलनुसार ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ या प्रवर्गासाठी प्रथम प्राधान्यक्रमानुसार 53; तर दुसऱ्या प्राधान्यक्रमानुसार 10 प्रभाग; असे 63 प्रभाग हे ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. यानंतर आजच्या कार्यक्रमादरम्यान ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग’ यासाठी आरक्षित 63 प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित 32 प्रभागांची निश्चिती ही प्राधान्यक्रम व सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली.
आजच्या सोडती दरम्यान सर्वांत शेवटी सर्वसाधारण 156 प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित असलेल्या 77 जागांच्या आरक्षणाची निश्चिती ही प्राधान्यक्रमानुसार व सोडतीनुसार करण्यात आली. आज झालेल्या सोडतीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदविण्यासाठी 2 ऑगस्ट ही अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले.