मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा (BMC) गलथान कारभार थेट सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याने चहुबाजूंनी टीका होत आहे. आता मनसे देखील बीएमसीवर जहरी टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी निष्पापांचे जीव घेणारे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी अतिरेकी असल्याची टीका केली आहे. गोरेगाव येथील दीड वर्षांच्या दिव्यांश उघड्या गटारात पडून वाहून जाण्याला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. तसंच दरवर्षी पालिकेच्या गलथानपणामुळं अनेक लोकांना अशाच पद्धतीने आपला जीव गमवावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देशपांडे यांनी महापालिकेच्या गलथान कारभारावर बोट ठेवत उघड्या मॅनहोलमध्ये पडून अनेक नागरिकांचा जीव जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “ज्या पद्धतीने निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना आपण देशद्रोही म्हणतो. त्याच पद्धतीने ज्यांच्या गलथान कारभारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत तेही अतिरेकी आहेत, देशद्रोही आहेत. जो पक्ष महापालिकेत सत्तेत आहे, त्यांच्या गलथान कारभारामुळेच निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, अतिरेकी आहेत.”
यावेळी संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात शिवसेना आणि महानगरपालिका प्रशासन यांना वेगळं करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, “जर एखादं हॉस्पिटल बांधलं, तर त्याचं श्रेय शिवसेना घेते. मग आता या जीवघेण्या गलथान कारभाराचीही जबाबदारी शिवसेनेची आहे.”
काय आहे संपूर्ण प्रकरण?
10 जुलैच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकात आईसोबत दीड वर्षाचा चिमुकला दिव्यांश सिंह दुकानात आला होता. खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरुन तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. त्याची दृश्य शेजारीच असलेल्या मशिदीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि कुटुबीयांचा आक्रोश सुरू झाला. त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला.
उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांशचा (Divyansh Singh) शोध आता थांबवण्यात आला आहे. 60 तास उलटून गेल्यानंतरही दिव्यांशचा शोध न लागल्याने दिव्यांशचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी याला जबाबदार मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले.
दरम्यान, याआधी पावसाळ्यातच उघड्या गटारामध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिकेवर सडकून टीका झाली होती. हे प्रकरण न्यायालयातही गेले. मागील 5 वर्षात मॅनहोलमध्ये पडून 328 लोकांचा जीव गेल्याचीही आकडेवारी समोर येत आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांनी पालिकेने आपल्या कारभारात सुधारणा केली नसल्याचेच सिद्ध होत आहे.