मुंबई : महानगर क्षेत्रात रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांवर (Vehicle parking) कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पर्यायाने वाहतुकीला (Traffic) अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही महानगरपालिका (Bmc) प्रशासनाने धडाक्यात सुरु केली आहे. मागील आठवडाभरात एकूण 2 हजार 381 वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर 379 जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर 782 बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. कोविड विषाणू संसर्ग कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे नागरी सेवा-सुविधांशी संबंधित दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त कोविड व्यवस्थापनाचे अतिरिक्त कामकाज असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कोविड कालावधीत रस्त्यांच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांवरील कारवाई करण्याचे कामकाज महानगरपालिकेकडून वाहतूक पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
बैठकीत काय निर्णय झाला?
कोविड परिस्थिती नियंत्रणात येऊन जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तेव्हाही वाहतूक सर्वसामान्यपणे सुरु असताना बेवारस वाहनांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने, त्या संदर्भात कारवाई करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यात मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला व इतरत्र बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कारवाई करणे, सदर कारवाईसाठी समन्वय साधणे तसेच या कामकाजामध्ये उद्भवत असलेल्या अडीअडचणी इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने उचलून नेलेली बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण चर्चेअंती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले होते की, बेवारस वाहने उचलून नेण्याबाबतची कार्यवाही वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवावी. त्यासाठी पोलिसांकडे असलेली टोईंग वाहने महानगरपालिकेकडे सुपूर्द करावीत. कोविडपूर्व कार्यपद्धतीनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांनी बेवारस वाहनांवर कार्यवाही करावी. त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) व सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांचे आवश्यक ते पालन करावे, असे निर्देश देखील डॉ. संजीव कुमार यांनी या बैठकीत दिले होते.
बेवारस अवस्थेत उचलून आणलेली वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. ही बाब लक्षात घेता, या निर्देशानुसार उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्रीमती चंदा जाधव यांनी लक्षात आणून दिले होते की, वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित शासकीय परवानग्या तातडीने प्राप्त करुन सदर वाहनांचा लिलाव करावा लागेल. जेणेकरुन, नव्याने येणाऱ्या बेवारस वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात उपलब्ध जागा, तेथे सद्यस्थितीत असलेली वाहने या अनुषंगाने माहिती पाठविण्याचे आवाहन देखील उप आयुक्त श्रीमती जाधव यांनी यावेळी केले होते.
त्यावर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले होते की, सर्व सहायक आयुक्तांनी यापूर्वीच्या बेवारस वाहनांचा लवकरात लवकर लिलाव होण्यासाठी 15 दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त कराव्यात व नियमानुसार लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबतचा नियमित आढावा संबंधित परिमंडळांच्या सह आयुक्त / उप आयुक्त यांनी घ्यावा, असे आदेश देण्यात आले.
संजय राऊतांसह 6 खासदरांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं