मुंबई: दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील नूतनीकरणाचे काम सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून करण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) यांचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने फेटाळला आहे. महापालिकेने गुरुवारी या कामाच्या निविदेची जाहिरात वृत्तपत्रात दिली. हा एकप्रकारे राज ठाकरे यांना शिवसेनेने दिलेला धक्का मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात यावरुन शिवसेना आणि मनसे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. (BMC refuse MNS chief Raj Thackeray CSR proposal for Shivaji park renovation project)
राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसेच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीने शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिवाजी पार्क मैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार करणार केली जाणारआहे.
शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली.
आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. महापालिका आयुक्त निविदा प्रक्रिया थांबवणार का? आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कात जाऊन या कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर बुधवारी आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मनसे या प्रकल्पात जास्त रस आहे, हे लक्षात येताच पालिकेकडून घाईघाईत निविदा काढण्यात आली.
(BMC refuse MNS chief Raj Thackeray CSR proposal for Shivaji park renovation project)