मुंबई : दर पाच वर्षांनी मुंबई महापालिका प्रभागांच्या आरक्षणात बदल केला जातो. परिणामी, पाच वर्षे बांधलेल्या प्रभागावर अनेक वेळा नगरसेवकांना पाणी सोडावे लागते. तर काहींची दुसरी संधीदेखील हुकते. त्यामुळे प्रभागांच्या आरक्षणात दर दहा वर्षांनी बदल करावा, अशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची ठरावाची सूचना बहुमताने पालिका महासभेत मंजूर करण्यात आली. मात्र भाजपने या सूचनेला विरोध दर्शवला आहे. (BMC Ward reservation to be change after every 10 years)
दहा वर्षांनी आरक्षण बदलण्याची शिवसेनेची मागणी
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना दर दहा वर्षांनी तर प्रभागांचे आरक्षण पाच वर्षांनी बदलण्यात येते. खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, महिला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा आरक्षणानुसार प्रभागाचे आरक्षण केले जाते. मुंबईतील 227 पैकी 50 टक्के प्रभाग हे खुल्यासह विविध प्रभागातील महिलांसाठी राखीव असतात. यावर्षी खुल्या वर्गासाठी असलेला प्रभाग पुढील निवडणुकीत इतर प्रवर्गासाठी किंवा महिलांसाठीही आरक्षित होऊ शकतो. त्यामुळे अनेक वेळा नगरसेवक आजूबाजूच्या विभागात कामे करण्यास सुरुवात करतात. त्याचा परिणाम त्यांच्या प्रभागावर होतो, असे निदर्शनास आणत दर दहा वर्षांनी प्रभागाचे आरक्षण बदलावे, अशी विनंती जाधव यांनी सभागृहापुढे केली होती.
मूलभूत आणि समान अधिकारांची पायमल्ली, भाजपचा दावा
या सूचनेला भाजपने विरोध दर्शवला आहे. आरक्षणात दहा वर्षांनी बदल करण्यासाठी पालिका अधिनियमात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विधिमंडळाच्या संमतीने सुधारणा करू शकते. परंतु अशी सुधारणा करताना भारतीय राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत आणि समान अधिकारांची पायमल्ली करू शकते काय? मूलभूत आणि समान अधिकारावर आपण गदा आणू शकतो का? असा सवाल भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. या ठरावाचे विरोधी पक्षनेते रवी राजा आणि गटनेत्या राखी जाधव यांनी समर्थन केले. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मतास टाकून बहुमताने मंजूर केला. (BMC Ward reservation to be change after every 10 years)
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1
संबंधित बातम्या :
आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?
राजकारणात आज मित्र असाल, उद्या नसाल, सुप्रीम कोर्टाचा भाजपला दणका, बीएमसी विरोधीपक्ष नेतेपद नाहीच
(BMC Ward reservation to be change after every 10 years)