मुंबई: मुंबई महापालिकेच्या (bmc) आरक्षणासाठी (reservation) महापालिकेने एक सूत्रं स्वीकारलं असून त्यानुसारच आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. गेल्या तीन महापालिका निवडणुकीत जे वॉर्ड आरक्षित नव्हते, त्या वॉर्डात आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गेली तीन टर्म एकाच वॉर्डातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या वॉर्डातील एकाच नगरसेवकांची (corporater) मक्तेदारी मोडीत निघाली असून त्या ठिकाणी आता नवीन चेहरा नगरसेवक म्हणून दिसणार आहे. आरक्षण चक्रानुक्रमे ही आरक्षण सोडत काढली गेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 8 लाख 3 हजार 236 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 29 हजार 653 एवढी आहे. त्यामुळे हे मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्व साधारण महिला वर्गासाठी 109 जागा राखीव आहेत. या आरक्षित जागांनुसारच सोडत काढण्यात आली. आरक्षण चक्रानुक्रमे फिरवून निश्चिती करून व आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रभागाचे आरक्षण हे प्रभागाच्या रचनेवर अवलंबून नसून प्रभाग ज्या प्रगणक गटांनी (Enumeration Block) बनलेला आहे, अशा प्रगणक गटांच्या त्या त्या वेळेच्या आरक्षणावर अवलंबून आहे, असं महापालिकेने आरक्षण सोडत काढण्यापूर्वीच स्पष्ट केलं.