मुंबई : पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या दयानंद काळे या विद्यार्थ्यांचा काल अपघाती मृत्यू झाला. दयानंदचा झाडावरून पडून अपघात झाला. तो झाडावरून कोसळताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण 15 मिनिटे त्याच्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी आज जोरदार आंदोलन करून ओपीडी बंद पाडली.
दयानंद काळे हा वरळीतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएमएसला शिकत होता. बुधवारी रात्री तो झाडावर आंबे तोडायला गेला होता. यावेळी तो झाडावरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याला आयसीयूमध्ये नेण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. मात्र, आयसीयूत नेल्यानंतर त्याच्यावर 15 मिनिटे कोणतेही उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळेच डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाचा जीव गेला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दयानंदवर रुग्णालयाने कोणताच उपचार केला नहाी. रुग्णालयात रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास उशीर झाला. परिणामी दयानंदचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. दयानंदचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सकाळी विद्यार्थ्यांनी रुग्णालयाला घेराव घातला. संतप्त झालेल्या विद्यार्थांनी रुग्णालय प्रशासनाला त्याचा जाब विचारत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले होते. या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून ओपीडी बंद पाडले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
दयानंदच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. हे प्रकरण दाबण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही केली जात आहे. दयानंदच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. रुग्णालयाच्या डीनने यावर भाष्य करावं, अशी मागणी विद्यार्थी करत होते.