मुंबई : मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट अलिबागजवळच्या समुद्रात उलटली. यावेळी बोटीत 78 प्रवासी होते, मात्र सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Boat capsizes Alibaug Mumbai coast)
वीकेंडचा मुहूर्त गाठत अनेक जण मुंबईहून अलिबागला जातात. शनिवारी सकाळी (14 मार्च) मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून निघालेली प्रवासी बोट मांडव्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह 78 जण बोटीत होते.
अलिबागजवळ बोट खडकावर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर बोट एका दिशेने कलंडली होती. मात्र मांडवा पोलिस कर्मचारी प्रशांत घरत आणि ‘सद्गुरु कृपा’ बोटीचे दोन खलाशी बचावकार्याला आले.
पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला.
हेही वाचा : Corona | मुंबई, पुणे, नागपुरात जिम, थिएटर आणि मॉल बंद
भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. या बोटीच्या चाचणीवेळीही मांडवा टर्मिनलवर बोट धडकून अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळीही अपघाताची व्याप्ती मोठी नव्हती.
Boat capsizes off Mumbai coast, all 78 on board rescued: Official
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2020
अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटला दीड वर्षांपूर्वी अपघात झाला होता. ही बोटही खडकावर आदळून बुडाली होती. बोटीवर असलेल्या 25 जणांपैकी 24 जणांना वाचवण्यात यश आलं होतं, तर सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. (Boat capsizes Alibaug Mumbai coast)