मुंबई : मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला ( VANDEBHARAT ) आता ‘बॉडीगार्ड’ मिळाला आहे. हा ‘बॉडीगार्ड’ या ट्रेनसाठी संरक्षक कवच म्हणून काम करणार आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावर सेमी बुलेट ( SEMIBULLET ) ट्रेन वंदे भारत सुरू झाल्यापासून ती प्रवाशांच्या सोयीसाठी परंतू गुरांच्या धडकेमुळेच जास्त चर्चेत आली होती. या आलीशान गाडीला वारंवार गुरांनी धडक दिल्याने तिचे एअरोडायनामिक नाक वारंवार चेपले आहे. त्यामुळे या मार्गावर पोलादी फेन्सिंग ( fencing ) ( कुंपण ) घालण्याचे काम सुरू आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावर या मेटल फेन्सिंग ( धातूचे कुंपण ) घालण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेटल फेन्सिंग घालण्याचे काम लवकरच पूर्ण होईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावरील कुंपणाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाल्यानंतर या मार्गावर भरधाव गाडीने गुरांना ठोकरल्याचे अनेक तीन ते चार अपघात झाले आहेत. या गाडीच्या उद्धाटनाच्या आदल्या दिवशीच ती मुंबई सेंट्रलला येत असताना गांधीनगर गुरांशी तिची जोरदार धडक झाली होती.
Fencing on #VandeBharat routes started. pic.twitter.com/vENiAp3ej9
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 29, 2023
मोकाट गुरे अनेकवेळा धडकली
गांधीनगर-मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस तिच्या सेवेपेक्षा गुरांना धडकण्यासाठी ओळखली जात होती. दर ताशी 160 किमी वेगाने धावणाऱ्या वंदेभारत ट्रेनला मोकाट गुरांनी धडकेच्या तीन त घटना घडल्या आहेत, त्यामुळे रेल्वेनेही सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गायी – म्हशींच्या धडकेने वंदेभारत्या इंजिनच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वेसेवाही बाधित झाली होती.
धातूचे कुंपण बसवण्यासाठी निविदा काढल्या
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 620 किमी पेक्षा जास्त मार्गाला तटबंदी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे, याकामासाठीच्या आठ निविदा मंजूर झाल्या आहेत. या कामासाठी सुमारे 245.26 कोटी रुपये खर्च येणार आहेत. आठही निविदाचे वाटप पूर्ण असून कामे वेगाने सुरू आहे. गुराख्यांनी आपली जनावरे रेल्वे रुळाजवळ सोडू नयेत, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने केले आहे.
रेल्वेच्या ‘नाका’चे नुकसान
वंदे भारत एक्स्प्रेस इंजिन लेस ट्रेन आहे. या गाडीचे इंजिन डिझाइन पारंपरिक रेल्वे इंजिनापेक्षा वेगळे आहे. ही गाडीला लोकल ट्रेन किंवा मेट्रोप्रमाणे मोटर केबिन आहे. या गाडीला इंजिनच्या पुढच्या बाजूला एअरोडायनामिक गार्ड (नाक) बसवलेले असते. गुरांना धडक बसल्यानंतर हा फायबरचा कोन ( नाक ) वारंवार तुटला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये पाच ते सहा महिन्यांत रुळांच्या दोन्ही बाजूला तटबंदी उभारली जाईल असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते. गुरांच्या धडकेमुळे 2022-23 या वर्षात एकूण 2,521 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.