मुंबई उच्च न्यायालयाने, कार्यालयातील लैंगिक छळाच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या महिलेने कार्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे (ICC) तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण पुण्यातील औद्योगिक न्यायालयात पोहचले. त्यात महिला कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल आल्यानंतर संबंधित सहकाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या केसांकडे पाहून त्याने ‘ये रेशमी जुल्फें’ हे गाणे म्हटल्याचा आरोप होता. हायकोर्टाने ‘ये रेशमी जुल्फें’ असे म्हणणे म्हणजे लैंगिक शोषण नाही, असे स्पष्ट केले.
न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी कार्यालयीन तक्रार समितीचा अहवाल अस्पष्ट आहे. तसेच साक्षीदारांचे म्हणणे योग्यरितीने मांडण्यात आले नाही, असे मत नोंदवले. पुरूष सहकाऱ्याने कोर्टात धाव घेतली होती. कार्यालयीन लैंगिक छळाबाबत समितीने त्याला दोषी ठरवत समितीने 30 सप्टेंबर 2022 रोजी अहवाल दिला होता. याचिकाकर्ता आणि कार्यालयीन पुरुष कर्मचाऱ्याविरोधातील तक्रारीसह इतर दोन तक्रारींचा उल्लेख सुद्धा कार्यालयीन अहवालात होता.
काय होती घटना?
वकील सना खान यांनी सुनावणीदरम्यान या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, याचिकाकर्ता आणि तक्रारकर्ती कार्यालयीन बैठकीसाठी एकत्र आले होते. तक्रारकर्ती तिच्या लांबसडक केसांमुळे थोडी अस्वस्थ वाटत होती. त्यावेळी याचिकाकर्त्याने, तुमचे लांब केस बांधण्यासाठी जेसीबीची गरज आहे का? अशी मिश्किल टिप्पणी करतानाच ये रेशमी जुल्फे असं गाणं म्हटलं.
याचिककर्त्याने तक्रारकर्तीवर केलेली टिप्पणी ही लैंगिक छळासाठी केली यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे मत कोर्टाने नोंदवले. तर त्याने पुरूष सहकाऱ्यावर केलेली टिप्पणी ही सुद्धा एक गंमत होती. त्या पुरुष सहकाऱ्याने ती टिप्पणी चुकीचे असल्याचे म्हटले नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी कार्यालयीन तक्रार समितीने आणि पुणे येथील औद्योगिक न्यायालयाने याप्रकरणात याचिकाकर्त्याला दोषी मानले होते. त्यानाराजीने त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. आपण गंमतीत ही बाब म्हटल्याचा त्याचा दावा होता. तर तक्रारकर्तीने हा लैंगिक छळ असल्याचे म्हटले होते. याचिकाकर्त्याविरोधात इतर दोन तक्रारींचा समावेश होता.