मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि इतर सहा जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आज सुनावणी झाली. अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून, 4 जुलैपर्यंत अटक किंवा कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. वांद्रे पालिका अधिकारी मारहाण प्रकरणात अनिल परब आणि इतर 6 जणांना दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. सुदीप पासबोला यांनी परब यांच्या वतीने युक्तिवाद केला.तर अॅड. जयसिंह देसाई यांनी सरकारची बाजू कोर्टात मांडली. घटनेत किंवा मारहाणीमध्ये परब यांचा सहभाग नाही. ते फक्त सदर ठिकाणी उपस्थित होते, असं अॅड. पासबोला यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. मात्र या प्रकरणी पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि 6 जणांवर 4 जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहा जणांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसंनी वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर परब आणि इतर यांच्या वतीने तातडीनं हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला.
मागील आठवड्यात वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय पालिकेनं अनधिकृत म्हणून पाडलं होतं. त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांना भेटण्यासाठी बीएमसीच्या कार्यालयात पोहोचलं.
पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते?, असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं. तेव्हा काही कर्मचारी पुढे आले असता कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली, असा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख आहे.