मुंबई : बहिणीच्या आत्महत्येनंतर संतापलेल्या भावाने पोलीस ठाण्यातच भावजीच्या गळ्यावर चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली (Nalasopara Police Station Murder). यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी भावाला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस ठाण्यातच हा हत्येचा थरार रंगल्याने परिसरात एकच खळबळ उडाली (Nalasopara Police Station Murder).
या घटनेत 22 वर्षीय आकाश केळकर यांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत हा हत्येचा थरार रंगला (Brother in law killed brother in law). पोलिसांसमोरच मेहुणा रवींद्र काळे याने आकाशवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली.
आकाश आणि आरोपी रवींद्र काळे हे दोघेही सातारा जिल्ह्यातील आहेत. आकाश आणि आरोपीची बहीण कोमल यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर हे दोघे नालासोपारा येथे राहायला आले. घरातील किरकोळ वादातून कोमल हिने रविवारी (13 ऑक्टोबर) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी (14 ऑक्टोबर) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोमलच्या आत्महत्येनंतर सोमवारी आकाश याला नालासोपारा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. नालासोपारा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत त्याची चौकशी सुरु असतानाच पोलिसांसमोरच रवींद्र काळे याने धारदार चाकूने आकाशच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी जखमी आकाशाला तात्काळ सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. काही कळायच्या आतच हा सर्व प्रकार घडल्यामुळे पोलीसही हतबल होते. पोलिसांनी आरोपी रवींद्र काळेला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आकाशच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर पोलीस ठाण्यातच हत्या होणार असतील, तर बाहेर माणसं सुरक्षित राहतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही आकाशच्या नातेवाईकांनी केली आहे.