कल्याण : वाहतूक कोंडीने कल्याणमध्ये बस चालकाचा जीव घेतलाय. कल्याणातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अत्यंत उग्र असे रूप घेऊ लागली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीने केडीएमटी चालकाचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वसंत हनुमंत शिंगोटे (परिचय क्रमांक 3153) असे या बस चालकाचे नाव आहे.
कल्याण पूर्वेतील गणेश मंदिर ते चिंचपाडा मार्गावर संध्याकाळी सुमारे 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेश मंदिर ते चिंचपाडा या मार्गावर दररोजप्रमाणे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यात वसंत शिंगोटे चालवत असणारी बस अडकून पडली. अचानक बसमधील बॅटरी फुटली आणि बस बंद पडली. त्याबाबत केडीएमटीच्या ब्रेक डाऊन विभागाला माहिती देत असताना वसंत शिंगोटे यांना भोवळ आली आणि ते गाडीच्या स्टेअरिंगवरच पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यावेळी सुदैवाने बस जागेवरच उभी होती आणि बसमध्ये अवघे 2 – 3 प्रवासी होते.
शिंगोटे स्टेअरिंगवर पडलेले पाहताच बसमधील प्रवासी, कंडक्टर आणि स्थानिक रहिवासी यांनी त्यांना बसमधून खाली उतरवले. शिंगोटे यांची परिस्थिती पाहता स्थानिक नागरिकांनी विनाविलंब रिक्षातून त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र या परिसरात त्यावेळी इतकी वाहतूक कोंडी झाली होती की त्यातून निघून रुग्णालयात जाईपर्यंत बराच वेळ खर्ची पडला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जो गोल्डन अवर्स असतो तो आणि पर्यायी शिंगोटे यांचा जीवही या वाहतूक कोंडीने हिरावून घेतला.
वाहतूक कोंडीसारख्या प्रश्नांना नेमका दोष कुणाला द्यावा असा प्रश्न पडतो. पोलीस, महापालिका, की वाढत्या वाहनांची संख्या? कारणं अनेक आहेत, पण यावर उपाय शोधणारं कुणीही नाही. कल्याणमध्ये यापूर्वी खड्ड्यांमुळेही अनेकांचा जीव गेलाय. शिवाय वाहतूक कोंडीमुळेही जीव जाण्याची वेळ आता आली आहे.
गेल्या सहा महिन्यात केडीएमटीमधील प्रदीप आष्टेकर (वाहक), रवींद्र जाधव (वाहक), जालिंदर मखुरे (चालक), अविनाश विटकर (वाहक), उत्तम शिंदे (सुरक्षा), तानाजी भोसले (सुरक्षा) आणि गुरुवारी वसंत शिंगोटे यांचा मृत्यू झाला आहे.