ठाणे : उल्हासनगरमध्ये दहशत माजविणारा कुख्यात गुंड माजी आमदार पप्पू कलानी सध्या तुरुंगात आहे. आता त्याचा मुलगा ओमी कलानी पप्पूचा वारसा चालवित असल्याची गंभीर बाब एका घटनेतून समोर आली आहे. त्याच्यावर 50 लाखांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
एकेकाळी उल्हासनगरमध्ये कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड पप्पू कलानी याची प्रचंड दहशत होती. पप्पू हा एका हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र त्याची पत्नी ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. तर कलानी यांची सून पंचम कलानी ही उल्हासनगरात महापौर आहे. कलानी कुटुंबाला भाजपच्या कृपा आशीर्वादाने महापौरपद मिळालंय.
काय आहे प्रकरण?
ओमी कलानी हा येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आमदारकी निवडणूक लढवण्याच्या बेतात आहे. त्यासाठी त्याने ओमी कलानी टीम तयार केली आहे. त्याच टीमच्या माध्यमातून त्याने नवा उद्योग सुरु केलाय. खाण तशी माती या म्हणी प्रमाणे ओमीने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एका व्यापाऱ्याकडे 50 लाखाची खंडणी मागितली आणि त्याचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. व्यापाऱ्याला हॉटेलमध्ये कोंडून ठेवलं. ओमी कलानीने त्याच्या साथीदारासह हा प्रताप केला.
ओमीसह त्याच्या आठ साथीदारांच्या विरोधात खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याचं नाव अनिल कांजानी आहे. अनिल कांजानी आणि अहमदाबादचे व्यापारी सुरेश लालवाणी यांच्यात पैशाची देवाणघेवाण आहे. अनिल यांना काल काही लोकांनी मुंबई विमानतळावर नेलं. त्या ठिकाणी सुरेश लालवाणी आले होते. ते पुन्हा अहमदाबादला निघून गेले. अनिल परत कल्याण पूर्वेतील आपल्या दुकानात आले.
दुकानात बसलेल्या अनिल यांना ओमीच्या साथीदारांनी विठ्ठलवाडी येथील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नेलं. त्याला मारहाण केली. तिथून त्याला सिमा रिसॉर्टमध्ये नेलं. सिमा रिसॉर्ट हे कलानीच्या मालकीचं आहे. त्या ठिकाणीही त्याला मारहाण करण्यात आली. तीन दिवसात 50 लाख रुपये दे आणि बाकीचे पैसेही लवकर दे अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवू अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिलं.
आतापर्यंत फक्त एकाला अटक
अनिल यांची सुटका झाल्यावर त्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन गाठलं. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर तक्रार दिली. पोलिसांनी ओमी कलानीसह सुरेश लालवाणी, निलेश, सनी तेलकर, विकी पंजाबी, विजय शिंदे, संतोष पांडे, कमलेश निकम, गुड्डू रॉय आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यापैकी सनीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी अजून सविस्तर माहिती दिलेली नाही. पण अनिल यांना मानसिक त्रास झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्यावर आणि कुटुंबीयांवर हल्ला केला जातो, असा व्यापाऱ्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे हा राजकीय डाव असल्याचा पलटवार ओमी कलानी यांनी केलाय. राजकीय दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा बनावट आहे. मी घाबरणार नाही आणि मी सुद्धा पोलिसांना सखोल चौकशीची मागणी केली आहे, असा दावा ओमी कलानीने केलाय.
भाजपच्या आशीर्वादाने कलानी कुटुंबाला उल्हासनगर महापालिकेचं महापौरपद मिळालंय. ओमी कलानी हा भाजपच्या जवळचा असल्याचं बोललं जातं. तर ओमी कलानीच्या आई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यामुळे सरकार कुणाचंही असो, घरात सत्ता कायम असते. त्यामुळे कलानी गँगला अभय मिळालंय. कलानी गँगची ही दहशत संपवून सर्वसामान्यांना सुरक्षिततेची प्रतीक्षा आहे.