मुंबई | 18 मार्च 2024 : मुंबईच्या भायखळा येथील राणी बागेतील आकर्षण असलेले परदेशी पेंग्विन पक्षी पाहायला मुंबईकरांची मोठी गर्दी होत असते. या पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घराचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पेंग्विनच्या घराला 18 पेंग्विनच्या रहीवासासाठी मोठे करण्याची योजना आहे. यासाठी अत्याधुनिक टनेल एक्वेरियम देखील बांधले जाणार आहे. या बांधकामासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे नवीन विस्तारीत घरकुल पुढील वर्षी 2025 पासून प्रेक्षकांसाठी खुली होणार आहे.
या विस्तार योजनेचे मुख्य आकर्षण टनल एक्वेरियम असणार आहे. सुरुवातीला तत्कालिन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी साल 2022 मध्ये घोषीत केलेल्या अन्य एका फिश एक्वेरियमच्या प्राथमिकतेमुळे पेंग्विनच्या घरकुल विस्ताराला उशीर झाला. आता फिश एक्वेरियम रद्द करण्यात येऊन टनल एक्वेरियमला हिरवा झेंडा मिळाला आहे. या एक्वेरियममध्ये दोन वॉक-थ्रु ऐक्रेलिक बोगदे आणि एक घुमटाच्या आकाराचे प्रवेशद्वार असणार आहे. एक बोगदा मुंगा मासळीला पाहण्यासाटी तर दुसरा खोल समुद्रातील जीव दाखविण्यासाठी असणार आहे. दहा लाख लिटर जीव रक्षक प्रणालीची देखील निर्मिती केली जाणार आहे.
या नव्या योजनेद्वारे प्राणी संग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढणार आहे. गेल्या वर्षी येथे प्रथमच मगरी आणि सुसरी पाहण्यासाठी पाण्याखालील गॅलरी सुरु करण्यात आली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले बॉटनिकल उद्यानातील वाढत्या प्राण्यांच्या मृत्यू दरा नंतरही हा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान येथील 47 प्राणी आणि 29 पक्ष्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या एक्वेरियममध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विनना दक्षिण कोरीयातील सेऊल येथून आणण्यात आले होते. गेल्या सात वर्षांत त्यांची संख्या 18 झाली आहे. राणी बागेत सध्या दोन वाघ, 18 हम्बोल्ट पेंग्विन आणि मगरी आहेत. यांना पाहायला प्रचंड गर्दी होत असते.