सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा जाहीर केला आहे. त्यात घोषणांचा पाऊस पाडला आहे. या राजकीय वातावरणात काही नेत्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेतली जातात. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक स्फोटक विधान केले आहे. सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आणि इतर जाती असा संघर्ष दिसत आहे. जातीचे राजकारण घट्ट होत असल्याचे दिसत आहे. गडकरी यांनी त्यावर भाष्य केले आहे.
जात कुणाच्या मनात?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यासारखाच विदर्भात मोठा फटका बसला होता. नागपूर, अकोला वगळता भाजपाला कमाल दाखवता आली नाही. बुलडाण्याची एक जागा राखण्यात शिंदे सेनेला यश आले. मराठा आरक्षण, कुणबी, आदिवासी, मुस्लिम हे मुद्दे त्यावेळी गाजले. पण गडकरी यांना या फॅक्टरचा फटका बसला नाही. या सर्व घटनाक्रमावर गडकरी यांनी मन मोकळं केलं.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी जात ही पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे स्फोटक वक्तव्य केलं. जात जनतेच्या मनात नाही, तर ती पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे ते म्हणाले. काही मतदारसंघात अगदी अल्पसंख्यांक जातीचा खासदार, आमदार निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जातीच्या आधारावर निवडणुकीची गणित मांडण्यात येतात, ती निकालानंतर चुकतात, असे ते म्हणाले. आपल्या जातीचा उपयोग करून दुसर्या जातीबद्दल विष कालवून निवडणुकीत कसा फायदा होईल, असा काही पक्षांचा आणि काही नेत्यांचा एक राजकीय कार्यक्रम असल्याचा घणाघात त्यांनी केला.
पण लोकांचं मत हे विकासाचं आहे. विविध योजनांतून त्यांना जो फायदा मिळाला. त्यांच्या जीवनात जो सुसह्यपणा आला, त्याकरीता असल्याचे ते म्हणाले. आरोग्य योजना, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालये, विधी विद्यापीठ यासह मिहान प्रकल्प आला. त्यातून 88 हजार लोकांच्या हाताला रोजगार मिळाला. त्यांची यादी माझ्याकडे आहे. ते कोणत्या जातीचे आहेत ते मला नाही माहिती, पण ते इथले आहेत. स्थानिक आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. जातीपेक्षा लोकांना विकास हवा असल्याचे त्यांनी ध्वनीत केले.