अमित शहा म्हणाले, आघाडी सरकार महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देणार काय?; सुभाष देसाई म्हणतात, आमचे उद्योग पळवणं आधी बंद करा

| Updated on: Dec 20, 2021 | 3:48 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असतात. या सरकारला शोधावं लागतं. हे लोक राज्याला गतवैभव मिळवून देणार आहेत काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.

अमित शहा म्हणाले, आघाडी सरकार महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देणार काय?; सुभाष देसाई म्हणतात, आमचे उद्योग पळवणं आधी बंद करा
subhash desai
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असतात. या सरकारला शोधावं लागतं. हे लोक राज्याला गतवैभव मिळवून देणार आहेत काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. त्यावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पलटवार केला आहे. आम्ही गतवैभव मिळवून देऊ. आधी केंद्र आणि गुजरातने राज्याचे उद्योग पळवणं बंद करावं, असा जोरदार हल्लाबोल सुभाष देसाई यांनी केला आहे.

सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला आहे. अमित शहांनी काल राजकीय भाष्य केले होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, अस शहा म्हणाले होते. पहिल्यांदा राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही उद्योगांची पळवापळवी झाली. पण ते गप्प बसले. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला.

गुजरातला गिफ्ट देणं सुरू

कोरोना काळात आम्ही 2 लाख कोटी रूपये आम्ही आणले. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. जे चालतच नाही. दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली, असं सांगतानाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

यूपीला 27 तर महाराष्ट्राला दोनच मेडिकल कॉलेज दिले

यावेळी त्यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी सापत्न वागणूक दिली याची जंत्रीच सादर केली. 2014 ते 2012 पर्यंत राज्यासाठी केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर झाले. यूपीला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता युपीला 2700 कोटी व महाराष्ट्राला फक्त 263 कोटी दिले गेले. सर्वात जास्त कोरोना रूग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसीवर दिल्या. केंद्राकडे जीएसटीची 6340 कोटींची थकबाकी आहे, असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला तात्काळ मंजूरी द्या, असं सांगतानाच तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री आजारी असल्याने कारभारावर फरक नाही

मुख्यमंत्री आजारी असल्यानं राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही. ते कॅबिनेटमध्ये नेहमी असतात. मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील. सोशल मीडियावर काय येतंय ते माहिती नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तीन वर्ष वाट पाहा

अमित शहा हे दोन वर्षांनी बोलत आहेत. ही त्यांची निराशा आहे. आणखी 3 वर्षे वाट पहा. नियमांप्रमाणेच तेव्हा मुकाबला होईल. काय होतंय ते पाहा, असं सांगातनाच हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील, असं त्यांनी सांगितलं.

कदम यांची पक्ष दखल घेईल

यावेळी त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर अधिक भाष्य केलं नाही. रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखलच घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंचा पलटवार

Sangli: निकालाच्या वेळी माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही! रोहित पाटील यांची भावनिक साद

Video | नादखुळा : 1600 किलोचा रेडा कृषी प्रदर्शनात सेंटर ऑफ अट्रॅक्शन, किंमत ऐकून चक्रावून जाल!