मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा महा मेगा ब्लॉक काल रात्री ठाणे स्थानकापासून सुरु झाला आहे. ठाणे स्थानक आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थानकातील फलाट रुंदीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी 63 तासांचा जम्बो ब्लॉक आहे. तर सीएसएमटीच्या फलाट क्र.9 आणि 10 ची लांबी वाढविण्यासाठी 36 तासांचा ब्लॉक शुक्रवार रात्रीपासून सुरु होत आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीला सुरु झालेला जम्बो ब्लॉक थेट रविवार 2 जून रोजी दुपारी संपणार आहे. या प्रदीर्घकालीन ब्लॉकमुळे विकेण्ड मध्य रेल्वेचा प्रवास टाळणे हाच उपाय आहे. कारण या तीन दिवसात 930 लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. तर 444 उपनगरीय लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. तर 446 शॉर्ट ओरिजनेट केल्या जाणार आहेत. तर लांबपल्ल्याच्या मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटर सिटी ट्रेनसह लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द झाल्या आहेत. या तीन दिवसीय ब्लॉकमुळे मुंबईकरांचे फारच हाल होत असून आवश्यकता असेल तरच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
ठाणे स्थानकातील 5 आणि 6 क्रमांकाच्या फलाटाची रुंदी वाढविण्यासाठी 63 तासांचा आणि मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक 9 आणि 10 ची लांबी वाढविण्यासाठी आणि नॉन इंटरलॉकींग कामासाठी 36 तासांचा स्पेशल ब्लॉक गुरुवारी रात्रीपासून हाती घेतला आहे. हा ब्लॉक गुरुवारी मध्यरात्री सुरु होईल ते रविवार 2 जून रोजी दुपारी संपणार आहे. ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 काम रुंदी करणाचे काम होणार असून ठाण्यातील मेगा ब्लॉक ( गुरुवारी ) आज रात्री साडेबारा वाजता सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मेगा ब्लॉक हा उद्या रात्री साडेबारा वाजता सुरू होणार आहे. मेगा ब्लॉग सुरू होण्या आधीच काही एक्सप्रेस गाड्या उशीरा येण्यास सुरुवात झाली आहे.
ठाण्याचा मेगाब्लॉक आज मध्यरात्री 12:30 ते रविवारी दुपारी 3:30 वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील ब्लॉक भायखळा पर्यंत 36 तासांसाठी बंद आहे. उद्या रात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज ते वडाळा पर्यंत 36 तासांसाठी बंद राहणार आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकल पुढील 63 तासांसाठी विस्कळीत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चा विस्तार केला जात आहे. यासाठी तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला जाणार असून तीन दिवसांत 930 लोकल फेऱ्या रद्द होतील.
ठाणे येथील फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणाचे काम होणार आहे त्यामुळे ठाण्यातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या कामासाठी खेळण्यातील लेगो प्रमाणे मोठे सिमेंट ब्लॉक सैन्याच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या मालगाडीद्वारे मुलुंड स्थानकात आणून ठेवले आहेत. हे सिमेंट ब्लॉक टाकून 63 तासांत जमीनीवर अंथरुण युद्ध पातळीवर फलाट क्रमांक 5 आणि 6 चे रुंदीकरण होणार आहे.
31 मे ( शुक्रवार ) रोजी 161 फेऱ्या रद्द
1 जून ( शनिवार ) रोजी 534 फेऱ्या रद्द
2 जून (रविवार) रोजी 235 फेऱ्या रद्द
31 मे ( शुक्रवार ) रोजी 7 फेऱ्या अंशत: रद्द
1 जून (शनिवार) रोजी 306 फेऱ्या अंशत: रद्द जातील.
2 जून ( रविवार ) रोजी 131 फेऱ्या रद्द
1 जून (शनिवार) रोजी 307 शॉर्ट ओरिजनेट
2 जून (रविवार) रोजी 139 शॉर्ट ओरिजनेट
हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, हावडा –सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, नांदेड –सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, जालना- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे – सीएसएमटी एक्स्प्रेस, जालना – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, साई नगर शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत…
सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी -नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी – साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी -जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस, सीएसएमटी -सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -हावडा दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी -नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस, सीएसएमटी -कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी – हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस आदी इंटर सिटी ट्रेन रद्द होतील.
सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे 1 जून रोजी पुणे – मुंबई मार्गावर धावणाऱ्या इंटर सिटी डेक्कन क्वीनसह सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटी या ट्रेन रद्द होतील. तसेच वंदे भारत, जनशताब्दी, तेजस, पंचवटी, राज्यराणी, महालक्ष्मी, गरीब रथ, तपोवन या लांबपल्ल्यांच्या ट्रेनही रद्द होणार आहेत.
एसटी महामंडळाने मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचे नियोजन केले असून प्रवासी मागणी पाहून त्यात वाढ करण्यात येणार आहे.
बेस्ट देखील 1 जूनच्या रा. 12.30 वा. पासून ते 2 जूनच्या दुपारी 12.30 वा. एकूण 12 बस गाड्यांद्वारे 232 फेऱ्या चालविणार आहे. बसमार्ग क्र. 1 मुंबई सीएमएमटी ते दादर पू.( 80 फेऱ्या ), बसमार्ग क्र. 2 लि., कुलाबा आगार ते भायखळा स्थानक प. ( 80 फेऱ्या ), ए.सी. – 10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक प. ( 72 फेऱ्या ) अशा 12 बसेसद्वारे एकूण 232 फेऱ्या धावणार आहेत.
तसेच 31 मे, 1 जून आणि 2 जूनच्या सकाळ ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत बस मार्ग क्र. ए.सी.-10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक प. ( 30 फेऱ्या ), बस मार्ग क्र. 11 लि. सीएसएमटी ते धारावी ( 30 फेऱ्या ), बस मार्ग क्र. 14 – डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते प्रतिक्षानगर ( 20 फेऱ्या ), बस मार्ग ए-45 – बॅकबे आगार ते एमएमआरडीए वसाहत, माहुल ( 20 फेऱ्या ), बस मार्ग क्र.1 – कुलाबा आगार ते खोदादार सर्कल ( 30 फेऱ्या ), बसमार्ग क्र. सी -42 राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क ( 20 फेऱ्या ), बस मार्ग क्र. 2 लि.- सीएसएमटी ते भायखळा स्थानक प. ( डबल डेकरच्या 40 फेऱ्या ) , बस मार्ग क्र. ए – 174 – अॅण्टॉप हील ते वीर कोतवाल उद्यान ( प्लाझा ) – (40 फेऱ्या ) अशा या सत्रात 43 बसेसद्वारे एकूण 254 फेऱ्या चालविण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.