रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरहेड वायर किंवा जमीनीखालून जाणाऱ्या वीज तारांची कामे करताना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. अनेकदा वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना वीजेचा धक्का बसून मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन विभागातील कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेने खास पद्धतीचे वीजरोधक शूज आणले आहेत. या गम बुटांप्रमाणे दिसणाऱ्या बुटांमुळे वीजेचा शॉक लागण्यासारख्या प्रकारांना अटकाव होणार असून कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
लोकलच्या मोटर्स वीजेवर धावत असून त्यासाठी पूर्वी डीसी करंट वापरला जात होता. आता सर्वत्र एसी करंटचा वापर केला जात आहे. ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यास मानवी शरीराचा अक्षरश: कोळसा होणेच शिल्लक असते. इतका उच्च दाबाचा वीज प्रवाह ( 25 हजार व्होल्टस ) ओव्हरहेड वायरमधून वाहत असतो. काम करताना वीजेचा धक्का लागल्याच्या टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना खास पद्धतीचे डायलेक्ट्रिक शूज आणले आहे. भारतीय रेल्वेवर प्रथमच अशा प्रकारचे वीजरोधक शूज ट्रॅक्शन वितरण कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेने आपल्या ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन डिपार्टमेंटच्या (TRD) कर्मचारी टीमला कामाच्या दरम्यान विद्युत शॉक बसण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्पेशल डायलेक्ट्रिक शूज पुरविले आहेत. हे खास पद्धतीचे सोल असलेले शूज परिधान करुन कर्मचाऱ्यांना ओव्हर हेड इक्विपमेंट, पॉवर सप्लाय इंस्टॉलेशन्स, सबस्टेशन इंस्टॉलेशन्स आणि इतर मोठ्या इलेक्ट्रिक कामांवर काम करता आहे.
भारतीय रेल्वेवरील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि मध्य रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना हे विशेष डायलेक्ट्रिक शूज पुरवणारी पहिली झोनल रेल्वे होण्याचा मान मिळाला आहे. डायलेक्ट्रिक शूज हे लाइव्ह इलेक्ट्रिकल उपकरणांजवळ काम करणाऱ्या तंत्रज्ञांसाठी आवश्यक सुरक्षा उपकरण आहे. भूमिगत किंवा ओव्हरहेड लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षक किटमध्ये अशा शूजचा समावेश करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने हे खास शूज मलेशियाहून आणले आहेत. या डायलेक्ट्रिक शूजचे वर्ग-3 मॉडेल 33KV विद्युत प्रवाहापर्यंत संरक्षण पुरवित असून या मॉडेलची किंमत रु. 20,000/- अधिक कर अशी आहे तर वर्ग-2 मॉडेल 17KV विद्युत प्रवाहापर्यंत संरक्षण पुरवित असून त्याची किंमत रु. 10,000/- अधिक कर अशी आहे.