लोकलने दररोजचा प्रवास करणाऱ्या चांगला अनुभव मिळावा त्यांना एसी लोकल आणि फर्स्टक्लासच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांमुळे गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने स्वतंत्र ‘टार्स्क फोर्स’ची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सने फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहीमेत एक स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 जाहीर करण्यात आला होता.
मध्य रेल्वेने 25 मे पासून उपनगरीय गाड्यांमधील अनियमित प्रवासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समर्पित टास्क फोर्स सुरु केला आहे. मोबाईल क्रमांक 7208819987 या व्हॉट्सॲप हेल्पलाईनमुळे प्रवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हा 14 कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. या मोबाईल क्रमांकावर मदतीची मागणी करता येते.
ही योजना चालू झाल्यानंतर 15 जूनपर्यंत, बेकायदा प्रवासाची एकूण 2,979 प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याद्वारे ज्यामुळे 10 लाख 4 हजार 985 रुपयांचा दंड आकारला आहे. या सक्रिय कारवाईमुळे प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. दररोज 100 हून अधिक प्रकरणांवरून दि. 15 जून 2024 पर्यंत रोज केवळ 7 प्रकरणे इतकी तक्रारींची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर दररोज 1810 लोकल फेऱ्यांद्वारे दररोज अंदाजे 33 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. मध्य रेल्वे धावणाऱ्या एकूण 66 एसी लोकलच्या फेऱ्यांमधून दररोज सरासरी अंदाजे 78,000 प्रवासी प्रवास करीत आहेत.