मुंबई : मध्य रेल्वेच्या हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई-नागपुर दुरंतो एक्सप्रेसला आता कायम स्वरुपी एक जादा एसी – 3 टियर डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. मध्य रेल्वेने हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई-नागपुर दुरंतो एक्सप्रेसला 31 मार्चपर्यंत ताप्तुरता एका अतिरिक्त थर्ड एसी डबा जोडला होता. आता त्यास कायमस्वरुपी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या नाशिक मार्गे धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमुळे कल्याण, नाशिक, जळगाव अशा महाराष्ट्रातील प्रवाशांना राजधानी दिल्लीत जाण्यासाठी सोय होत आहे. राजधानी एक्सप्रेसला आता एक्स्ट्रा थर्ड एसी डबा कायम स्वरुपी जोडल्याने प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. ट्रेन क्रमांक : 22221 सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दिनांक 01 एप्रिल 2024 पासून मुंबई सीएसएमटीवरुन आणि परतीच्या प्रवासाची ट्रेन क्रमांक : 22222 हजरत निजामुद्दीन – मुंबई सीएसएमटी-राजधानी एक्सप्रेसला दिनांक 0 2 एप्रिल 2024 पासून हजरत निजामुद्दीन ( नवी दिल्ली ) पासून अतिरिक्त थर्ड एसी डबा लावला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 वर्षांनी मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस जानेवारी 2019 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून मुंबईतीलच नव्हे तर नाशिक, जळगाव आणि भोपाळमधील प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे.
ट्रेन क्र :12289 नागपुर – सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेसला दिनांक 01 एप्रिल 2024 पासून नागपूरहून तर परतीची ट्रेन क्र : 12290 सीएसएमटी-नागपुर दुरंतो एक्सप्रेसला मुंबई सीएसएमटी स्थानकापासून दिनांक 02 एप्रिल 2024 पासून अतिरिक्त थर्ड एसी डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.