मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यांच्या उपोषणापुढे राज्य सरकारला नमते घ्यावे लागले. राज्य सरकारने मराठा-ओबीसी दस्तावेज शोधण्यासाठी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे. पण यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. नागपूरपासून ते मुंबईपर्यंत ओबीसी संघटनांनी या मागणीला विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी पण या मागणीला विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी तोंडसुख घेतले होते. भुजबळ यांनी आपल्यालाच लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले होते. दोघांनी मध्यंतरी एकमेकांवर टीका टाळली होती. पण आता एका ऑडिओ क्लिपची या वादाला फोडणी बसली आहे.
राज्यव्यापी दौरा संपला
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा काढला होता. 12 दिवसानंतर या दौऱ्याचा आज समारोप झाला. या दौऱ्यात त्यांना अनेक ठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. त्यांच्यामागे मोठी ताकद असल्याचे दिसून आले. आता 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील त्यांच्या मुळ गावी, अंतरवाली सराटी येथे मोठी सभा होणार आहे.
सभेपूर्वीच वादाची ठिणगी
या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. एकच दिवस आडवा आहे. त्यापूर्वीच छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप चर्चेत आली आहे. समता परिषदेच्या बैठकीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 100 एकर शेत साफ करण्यात येत आहे, मैदान तयार करण्यात येत आहे. या सभेसाठी 7 कोटी रुपये जमा झाले आहेत. एवढा पैसा येतो तरी कुठून? असा सवाल त्यांनी विचारला आहे. या ऑडिओ क्लिपची Tv9 मराठी पुष्टी करत नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी स्पष्ट मत मांडले आहे. या बैठकीतही तेच धोरण समोर आले आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. पण ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचे छगन भुजबळ यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.