मुंबई: दहिसर येथे अग्निशमन दलाची भरती सुरू झाली आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या या भरती दरम्यान प्रचंड गोंधळ झाला आहे. काही तरुणींना भरतीत अपात्र ठरवण्यात आल्याने या तरुणी भडकल्या. त्यांनी मैदानातच जोरदार आंदोलन सुरू केलं. आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत या तरुणींनी जोरदार घोषणा केली. या तरुणी अचानक आक्रमक झाल्याने भरती प्रक्रिया थांबली. त्यामुळे या आंदोलक तरुणींना मैदानातून हुसकावून लावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण या तरुणी अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. यावेळी अनेक तरुणींच्या पायाला, हाताला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तापले.
दहिसरमध्ये अग्निशमन दलाची भरती होती. महिलांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात होती. या भरतीसाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून तरुणी आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासूनच या तरुणींनी मुंबईत तळ ठोकला होता. आज त्या भरतीसाठी मैदानात आल्या. पण यावेळी त्यांच्या उंचीचं कारण देऊन त्यांना अपात्र करण्यात आलं.
अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आलं. त्यामुळे या तरुणींचा संतापाचा पारा अनावर झाला. आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. या तरुणींनी महापालिका हाय हाय, बीएमसी हाय हायच्या घोषणा दिल्या. सर्वच तरुणींनी मैदानात येऊन जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.
n1MNMKFw
त्यामुळे भरती प्रक्रिया थांबली. या परिसरात अचानक गोंधळ झाल्याने पोलिसांनी या तरुणींना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी आमच्या पायावर, गुडघ्यावर हातावर लाठीमार केला. आमच्या डोक्यालाही मार लागला. आमचं डोकं दाबण्यात आलं, असा आरोप या तरुणींनी केला. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आम्ही दोन दिवसांपासून येथे आलो. आमची उंची असतानाही आम्हाला डावलण्यात आलं आहे. हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करा. पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली.
162 सेंटीमीटर उंची असावी अशी अग्निशमन दलाने अट घातली आहे. पण आमची उंची त्यापेक्षा जास्त असूनही आम्हाला भरती प्रक्रियेतून डावलण्यात आलं. हा आमच्यावर अन्याय आहे, असं या तरुणींनी सांगितलं. तुम्हाला हीच भरती प्रक्रिया आहे का? असा उद्धट सवाल आम्हाला अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा दावाही या तरुणींनी केला.