चेंबूर विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थिती काय?; कुणाला उमेदवारी मिळणार?

| Updated on: Oct 21, 2024 | 3:41 PM

Chembur Constituency Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. अशात सगळ्याच विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चेंबूर विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय आहे? याबाबतच आढावा घेऊयात, वाचा सविस्तर बातमी...

चेंबूर विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थिती काय?; कुणाला उमेदवारी मिळणार?
विधानभवन
Image Credit source: Internet
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. 288 मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातील (Chembur Constituency) सध्याची स्थिती काय आहे? जाणूनन घेऊयात…. या भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील चाकरमानी या भागात स्थायिक आहे. त्यांचा या मतदारसंघातील अधिक प्रभाव आहे. 173 क्रमांकाचा हा मतदारसंघ आहे. खेकडा म्हणजेच चिंबोरीच्या नावावरून या मतदारसंघाचं चेंबूर (Chembur Vidhansabha Constituency)  असं नाव पडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर या मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चेंबुर मतदारसंघाचा इतिहास

1962 पासून हा मतदारसंघ आहे. 1962 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचा वरचष्मा राहिला. 2014 ला पहिल्यांदाच शिवसेना जिंकली. चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे विजयी झाले. जरी चेंबूरमध्ये कोकणी मतदार जास्त असला तरी दलित आणि उत्तर भारतीय मतदारही या भागातील राजकारणावर प्रभाव टाकतो.

कुणाला उमेदवारी मिळणार?

2019 ला चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांचा विजय झाला होता. प्रकाश फातर्पेकर यांना 53 हजार 264 मतं मिळाली होती. काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रकाश फातर्पेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे आता या मतदारसंघात प्रकाश फातर्पेकर यांना यंदा उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रकाश फातर्पेकर यांच्यासोबतच माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या चेंबूरमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

चेंबूर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग आहे. या ठिकाणी नागरी समस्यांकडे लक्ष देणारा लोकप्रतिनिधी हवा, अशी स्थानिकांची मागणी आहे. मेट्रो- मोनो रेल या भागातून जातात. या भागात रियल इस्टेटचं जाळं मोठं आहे. चेंबूर स्थानकाच्या पश्चिमेला झोपडपट्टी पाहायला मिळते. तर काही भागात मोठ मोठे टॉवर्स आहेत. त्यामुळे पायभूत सुविधांकडे लोक प्रतिनिधींचं लक्ष हवं, असं स्थानिक सांगतात.