राज्यातील नेत्यांचे आणि पक्षांची जागा वाटपासाठी युद्ध पातळीवर चर्चा, बैठकाचं सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकले आहेत. या विधानसभेत मराठा फॅक्टरची ताकद दाखवण्यासाठी ते सध्या पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. अंतरवाली सराटीत बैठका, भेटीगाठी सुरू आहेत. या विधानसभा निवडणुकीत थेट उतरायचे की उमेदवारांना पाठिंबा द्यायचा हे थोड्याच वेळात ते जाहीर करतील. पण त्याअगोदर छगन भुजबळ यांनी त्यांना अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरक्षणावरून आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. दोघांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केला. आता भुजबळांनी जरांगे यांना असा चिमटा काढला आहे.
जरांगे यांनी रिंगणात उतरावे
मनोज जरांगे यांच्या आजच्या भूमिकेअगोदरच छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे. जी भूमिका घेतील ते घेतील, मला तर असं वाटतं त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा नशीब आजमावायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
जरांगे थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार
या विधानसभा निवडणुकीत थेट उतरायचे की पाडापाडी करायची यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे. आज अंतरवाली सराटीत याविषयीची बैठक घेण्यात येत आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात?
तुम्ही बातम्या देत आहात तर तुम्हाला जास्त माहिती असेल. समीर भाऊ माझ्याबरोबर आहेत. अजित दादांबरोबर आहेत. आम्ही काम करत आहोत. आता तुम्ही सजेस्टिव न्यूज देतात. तुमच्या मनात आहे का समीर भाऊंनी उभे राहावे. मला काही कळलं मी कालपासून तुम्ही एवढे चालवलं. त्याला काही बेस आहे का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.